आई बाळाला विमानतळावर विसरली, प्रसंगावधान राखत वैमानिकाने फ्लाइट मागे वळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:56 PM2019-03-12T12:56:19+5:302019-03-12T12:57:08+5:30
प्रवासाला निघाल्यावर अनेकजण घाईगडबडीत एखादी वस्तू किंवा सामान सर्रासपणे विसरतात. असे तुमच्याही बाबतीत घडले असेल. मात्र...
जेद्दाह - प्रवासाला निघाल्यावर अनेकजण घाईगडबडीत एखादी वस्तू किंवा सामान सर्रासपणे विसरतात. असे तुमच्याही बाबतीत घडले असेल. मात्र विमानातून परदेशात निघालेली एक महिला चक्क आपल्या मुलालाच विमानतळावर विसरून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, आपण मुलाला विसरून आल्याचे लक्षात आल्यावर संबंधित महिलेने विमानातच आकांत सुरू केला, अखेरीस वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान मागे वळवण्याची परवानगी मिळवली आणि या माय लेकराची पुन्हा भेट घडवून आणली.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, फ्लाइट एसव्ही 832 हे विमान जेद्दा येथून क्वालालंपूरसाठी रवाना झाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका महिलेले आपले मूल विमानतळावरच राहिल्याचे सांगून रडारड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार कळल्यानंतर वैमानिकाने तातडीने नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला.
या प्रकाराचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. ज्यात अशा प्रसंगी काय करावे असा नियम आहे? अशी विचारणा एटीसीमधील एक कर्मचारी आपल्या सहकाऱ्याकडे करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर एटीसीमधील कर्मचारी वैमानिकास विमानात काय चालले आहे हे पुन्हा सांगण्याची विनंती करतात. तेव्हा पायटल सांगतो की, एक महिला आपल्या मुलाला किंग अब्दुल अझीझ इंटरनॅशनल विमानतळावर विसरून आली आहे. तसेच आता पुढील प्रवास करण्यास नकार देत आहे.
त्यानंतर एटीसीने सदर वैमानिकास विमान माघारी वळवून पुन्हा उतरण्याची परवानगी दिली. दरम्यान, वैमानिकाने मानवीय दृष्टीकोनातून दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सोशल मीडियामधून कौतुक होत आहे. मात्र आपल्या मुलाला विसरून गेलेल्या बेफिकीर महिलेवर टीका होत आहे. दरम्यान, विमान सुरू झाल्यानंतर नेमकं किती वेळाने सदर महिलेला आपल्या मुलाची आठवण आली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याआधी गतवर्षी जर्मनीमध्येही असा प्रकार घडला होता. तेव्हा एक जोडपे आपल्या मुलीला विमानतळावर विसरून गेले होते.