मुलींकडून अभ्यास करुन घेण्यासाठी घेतला iPad; आईला घेऊन गेले पोलीस, आला चोरीचा आळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:59 IST2025-04-14T10:58:21+5:302025-04-14T10:59:16+5:30
आईने तिच्या मुलींकडून आयपॅड घेतला म्हणून तिला चोर समजून अटक करण्यात आली आहे

मुलींकडून अभ्यास करुन घेण्यासाठी घेतला iPad; आईला घेऊन गेले पोलीस, आला चोरीचा आळ
मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना मोबाईल आणि डिजिटल उपकरणांपासून दूर ठेवतात. पण आपल्या मुलांना शिस्त लावणं एका आईला चांगलंच महागात पडलं आहे. ब्रिटनमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईने तिच्या मुलींकडून आयपॅड घेतला म्हणून तिला चोर समजून अटक करण्यात आली आहे
यूके येथे राहणाऱ्या आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या ५० वर्षीय वनीसा ब्राउन यांना त्यांच्या मुलींनी डिजिटल उपकरणांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं वाटत होतं. पण या 'कडकपणा'मुळे त्यांनाच जेलमध्ये जावं लागलं. २६ मार्च रोजी पोलिसांना एक फोन आला. जेव्हा पोलीस वनीसाच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीने सांगितलं की, दोन आयपॅड चोरीला गेले आहेत. यानंतर, पोलिसांनी ट्रॅकिंग सिस्टमद्वारे आयपॅड ट्रेस केले आणि वनीसापर्यंत पोहोचले.
"मी कॉफी पीत होते तेव्हा पोलीस आले आणि मला घेऊन गेले"
जेव्हा पोलिसांनी आयपॅडचं लोकेशन ट्रॅक केलं आणि ते परत मागितले तेव्हा वनीसाने ते देण्यास नकार दिला. त्यानंतर चोरीच्या संशयावरून तिला अटक करण्यात आली. द गार्डियनशी बोलताना वनीसाने संपूर्ण घटना 'धक्कादायक' असल्याचं म्हटलं. तिने सांगितलं की, "मी नुकतीच माझ्या आईच्या घरी कॉफी पिण्यासाठी गेले होते. मी कॉफी पीत होते तेव्हा पोलीस आले आणि मला घेऊन गेले. तिथे पोलिसांनी मला गुन्हेगारासारखं वागवलं. कारण मी फक्त माझ्या मुलींचे आयपॅड काही काळासाठी घेतले होते."
"८० वर्षांच्या आईशीही गैरवर्तन”
"पोलिसांनी मला केवळ ७ तास ताब्यात घेतलं, ८० वर्षांच्या आईशीही गैरवर्तन केलं. बोटांचे ठसे घेण्यात आले, वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पहिले तीन तास वकिलाशी बोलण्याची परवानगी नव्हती." वनीसा यांची आता जामिनावर सुटका करण्यात आली, परंतु या अटीवर की त्यांना या प्रकरणाशी संबंधित कोणाशीही संपर्क साधू नये. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांची चूक मान्य केली आणि केस बंद केली. तपासात हे स्पष्ट झालं की आयपॅड मुलांचे होते आणि आईला ते घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.