दावोस परिषदेत पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:21 PM2024-01-17T12:21:47+5:302024-01-17T12:21:57+5:30
आयनॉक्स एअर प्रोडक्शनबरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
आयनॉक्स एअर प्रोडक्शनबरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे महाराष्ट्राच्या ग्रीन हायड्रोजनच्या धोरणाला बळकटी मिळाली आहे. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी आहे. अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा आदी उपस्थित होते.
एआय हबसाठी करार
महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स यांच्यासोबत ४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला.
जिंदालसमवेत ४१ हजार कोटींचा करार
जिंदाल समूहाशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे महाराष्ट्रात ५ हजार नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात निर्माण होतील.