जमावाला घाबरून खासदारानं केली आत्महत्या; श्रीलंकेत वणवा पेटला, लोक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:15 PM2022-05-10T15:15:45+5:302022-05-10T15:16:24+5:30
श्रीलंकेत सुरू असलेला हिंसाचार पाहता देशभरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. राजधानी कोलंबोमध्ये सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी लष्करावर सोपवण्यात आली आहे.
Sri Lanka Crisis: आर्थिक डबघाईला आलेल्या श्रीलंकेत आता लोकांचा संताप अनावर होत चालला आहे. या संकटात सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला जीव गमवावा लागला आहे. तर महिंदा राजपक्षे यांचं घरही लोकांनी जाळून टाकलं आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात रक्तपात होत असून आर्थिक मंदीच्या संघर्षात खासदारांसह अनेकांचे जीव गेले आहेत. आतापर्यंत १५० जण जखमी झाले आहेत. राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंकेत सुरू असलेला हिंसाचार पाहता देशभरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. राजधानी कोलंबोमध्ये सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी लष्करावर सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर शांततेने आंदोलनकर्ते निदर्शने करत होते. मात्र त्यावेळी त्यांचे बंधू पंतप्रधान राजपक्षे यांच्या कट्टर समर्थकांनी आंदोलनकर्त्यांवर हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी हिंसक वळण लागलं. सोमवारी सत्ताधारी पक्षाचे खासदार Amarakeerthi Athukorala यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांच्या वाहनाला चहुबाजूने प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी घेरलं होते. त्यावेळी खासदारांच्या गाडीत फायरिंग झाली. तेव्हा लोक भडकले. त्यानंतर खासदार गाडीतून पळून एका इमारतीत लपले. तिथेही लोकांनी त्यांना घेरलं. जमाव पाठलाग करत असल्याचं पाहून खासदार भयभीत झाले. त्यांनी स्वत:च्या पिस्तुलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. इमारतीत त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला. या घटनेत २७ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला. खासदाराच्या गाडीतून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
राजपक्षे आणि खासदारांना निशाणा
देशातील वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदी आली आहे. त्यात होरपळलेल्या लोकांनी हिंसक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या लोकांनी महिंदा राजपक्षे यांचं घरही जाळून टाकलं. त्याचसोबत खासदाराच्या घरांचीही तोडफोड केली. राष्ट्रहितासाठी पंतप्रधान पद सोडत असल्याचं महिंदा राजपक्षे यांनी जाहीर केले. त्यामुळे श्रीलंकेत सरकार भंग झाले आहे. राजपक्षे यांच्या कुटुंबाचा सहभाग असेल अशा कुठल्याही व्यक्तीशी आघाडी न करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. देशात आपत्कालीन परिस्थिती झाली आहे. ज्यामध्ये लष्कराला कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखत थेट अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.