बांगलादेशचे नवे पंतप्रधान नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 06:43 PM2024-08-05T18:43:01+5:302024-08-05T18:43:51+5:30
Muhammad Yunus : शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली.
बांगलादेशात आरक्षणाविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी निर्णायक वळण घेतले आहे. येथीस हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्या भारताकडे येण्यासाठी रवाना झाल्याची चर्चा आहे. तसेच, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली.
आता नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस देशाचे नवे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशाला संबोधित केले. लष्करप्रमुख म्हणाले की, देशात ४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करतो. मी सर्व जबाबदारी घेत आहे.
मुहम्मद युनूस बांगलादेशचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. त्यांच्या नावाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुहम्मद युनूस हे देशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या देशातील अंतरिम सरकारमध्ये १८ जणांचा समावेश करण्यात आला आहे. या सरकारमध्ये प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये बँकिंग, वकील, पत्रकारिता, शिक्षण, अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित लोकांना अंतरिम सरकारमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, बांगलादेशी विद्यार्थी गेल्या महिन्यापासून शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करत होते. हे आंदोलन खूपच हिंसक झाले होते. नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. अखेर या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.