26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला अटक करा, अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 06:37 PM2017-11-24T18:37:04+5:302017-11-24T19:54:50+5:30
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या सुटकेवर अखेर अमेरिकेने भाष्य केले आहे.
वॉशिंग्टन : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या सुटकेवर अखेर अमेरिकेने भाष्य केले आहे. हाफीजची नजरकैदेतून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. जानेवारीपासून हाफीज सईद नजरकैदेत होता. बुधवारी पाकिस्तानातील न्यायिक समीक्षा बोर्डाने जमता-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले होते.
सुटका झाल्यानंतर सईदने शुक्रवारी लाहोरमधल्या मशिदीत आपल्या समर्थकांना संबोधित केले. अमेरिकेने सईदच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त करताना त्याला पुन्हा अटक करण्यात यावी, असे म्हटले आहे. लष्कर-ए-तय्यबा ही सईदची दहशतवादी संघटना अमेरिकन नागरिकांसह शेकडो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट म्हणाल्या.
सईद मोकाट सुटता कामा नये, त्याला अटक करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे, असे नॉरेट म्हणाल्या.
सईदची नजरकैद आणखीं तीन महिन्यांनी वाढवण्यासाठी पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने केलेली विनंती न्यायिक समीक्षा बोर्डाने फेटाळून लावली. 31 जानेवारीला सईद आणि त्याचे चार साथीदार अब्दुल्लाह उबेद, मलिक झफर, अब्दुल रहमान अबिद आणि काझी काशिफ हुसैन यांना पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याखाली 90 दिवसांसाठी अटक केली होती.
सुटकेनंतर पाकिस्तानमध्ये रात्रभर जश्न, केक कापून साजरं केलं स्वातंत्र्य
हाफिज सईदची लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा त्याने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं. इतकंच नाही, गुरुवारी रात्री हाफिज सईदच्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना, पाकिस्तान सरकारमधील अधिकारी हाफिज सईदचा साहेब म्हणून उल्लेख करत होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष पुर्ण होत असतानाच, हाफिज सईदची सुटका झाली आहे.
हाफिज सईदचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने समर्थकांसोबत आनंद साजरा केला. हाफिज सईदचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये हाफिज केक आणि मिठाई खाताना दिसत आहे.