मुंबई हल्ल्यातील सूत्रधार साजिद मीरला तुरुंगवास; पाकचा बनाव उघड, यापूर्वी केले होते मृत घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 09:45 AM2022-06-26T09:45:17+5:302022-06-26T09:46:19+5:30
पंजाब पोलिसांचा दहशतवादविरोधी विभाग (सीटीडी) हा नेहमीच अशा दोषी लोकांची माहिती देतो. पण, यावेळी तसे झाले नाही.
लाहोर : पाकिस्तानमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने २००८ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार साजिद मजीद मीर (४४) याला दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याप्रकरणी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
पाकिस्तानने यापूर्वी साजिद मजीद मीर याला मृत घोषित केले होते. साजिद मीर हा मुंबई हल्ला प्रकरणी भारताला हव्या असलेल्या अतिरेक्यांच्या यादीतील प्रमुख अतिरेकी आहे. त्याच्यावर अमेरिकेनेही ५० लाख डॉलरचे बक्षीस ठेवलेले आहे. पाकिस्तान आर्थिक कारवाई कार्यदलाच्या (एफएटीएफ) ग्रे यादीतून बाहेर निघण्यासाठी संघर्ष करत असताना पाकिस्तानात न्यायालयाने या अतिरेक्याला ही शिक्षा सुनावली आहे.
पंजाब पोलिसांचा दहशतवादविरोधी विभाग (सीटीडी) हा नेहमीच अशा दोषी लोकांची माहिती देतो. पण, यावेळी तसे झाले नाही.
कोण आहे साजिद?
साजिद मीर हा मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर समजला जातो. साजिद हा २००५ मध्ये बनावट नावाच्या पासपोर्टने भारतात आला होता. साजिद मजीद मीर याला एप्रिलमध्ये अटक केल्यानंतर लाहौरच्या कोट लखपत तुरुंगात तो बंद आहे. न्यायालयाने साजिदवर चार लाख रुपयांचा दंडही आकारला आहे. पाकिस्तानने यापूर्वी असा दावा केला होता की, साजिदचा मृत्यू झाला आहे.