मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर लख्वी सुटला, भारताचा विरोध
By Admin | Published: April 10, 2015 06:08 PM2015-04-10T18:08:46+5:302015-04-10T18:11:45+5:30
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर रेहमान लख्वीची रावळपिंडीतील तुरुंगातून सुटका झाली असून भारताने लख्वीच्या सुटकेचा निषेध दर्शवला आहे.
>इस्लामाबाद, दि. १० - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर रेहमान लख्वीची रावळपिंडीतील तुरुंगातून सुटका झाली असून भारताने लख्वीच्या सुटकेचा निषेध दर्शवला आहे. लख्वीची सुटका म्हणजे २६/११ मधील हल्ल्यातील पिडीतांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भारताने दिली आहे.
झकी ऊर रेहमान लख्वीने मुंबई हल्ल्याचा कट रचल्याचा भारताचा आरोप असून भारताच्या दबावासमोर नमते घेत पाक सरकारने २००९ मध्ये झकीऊर रेहमान लख्वीला अटक केली होती. गेल्या सहा वर्षांपासून लख्वी रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात होता. लख्वीली तुरुंगात ठेवणे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याची तात्काळ तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश लाहोर हायकोर्टाने गुरुवारी दिले होते. यानंतर शुक्रवारी लख्वीला तुरुंगातून सोडण्यात आले. सुटकेनंतर लख्वी कुठे जाईल हे माहित नाही असे लख्वीचे वकिल नासीर अब्बास यांनी सांगितले.
लख्वीच्या सुटकेचे भारतात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भारताने यापूर्वीही लख्वीला जामीन देण्याच्या निर्णयाचा विरोध दर्शवला होता. लख्वीची सुटका करुन पाकने मुंबई हल्ल्यातील पिडीतांचा अपमान केला अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.