भारतीय वंशाच्या बालिकेची हत्या; १०० वर्षांची शिक्षा, अमेरिकेतील न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:24 AM2023-03-27T10:24:51+5:302023-03-27T10:24:59+5:30
सुपर ८ मोटेल नावाच्या हॉटेलच्या पार्किंग जागेत जोसेफची एका माणसाशी बाचाबाची झाली.
वाॅशिंग्टन : भारतीय वंशाची असलेल्या व पाच वर्षे वयाच्या बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला अमेरिकेच्या न्यायालयाने १०० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अमेरिकेतील लुसियाना येथे २०२१ साली म्या पटेल ही बालिका एका हाॅटेलच्या खोलीत खेळत असताना अचानक एक गोळी येऊन तिच्या डोक्यात घुसली. गंभीर जखमी झालेल्या म्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर तीन दिवसांनी उपचारांदरम्यान तिचे निधन झाले. ही गोळी झाडणाऱ्या जोसेफ ली स्मिथ याला पोलिसांनी अटक केली होती.
सुपर ८ मोटेल नावाच्या हॉटेलच्या पार्किंग जागेत जोसेफची एका माणसाशी बाचाबाची झाली. त्यावेळी आपल्याकडील पिस्तूलाने त्याने समोरच्या माणसावर गोळीबार केला. सुपर ८ मोटेलचे मालक विमल व स्नेहल पटेल हे त्या हॉटेलच्या तळमजल्यावरील खोलीत राहतात. तिथेच पटेल यांची मुलगी म्या खेळत होती. जोसेफने झाडलेली गोळी त्याच्याशी भांडणाऱ्या माणसाला लागली नाही.
मात्र, त्या गोळीने म्या पटेल मरण पावली. या प्रकरणी अमेरिकी न्यायालयाने जोसेफ ली स्मिथला अतिशय कडक शिक्षा सुनावली आहे.(वृत्तसंस्था)