घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून
By admin | Published: September 5, 2016 04:12 AM2016-09-05T04:12:29+5:302016-09-05T04:12:29+5:30
पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला.
लाहोर : आवडीच्या व्यक्तीशी विवाह केल्याबद्दल पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला. समिआ शाहीद (२८, रा. धोक पंडोरी खेडेगाव, पंजाब प्रांत) ही १५ जुलै रोजी दुबईहून आपल्या आजारी वडिलांना भेटायला पाकिस्तानात आली होती. तिचा २० जुलै रोजी खून झाला. तिच्या वडिलांनी मात्र तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा केला होता.
ब्रिटिश खासदार नाझ शाह यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहून हा खून कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी (आॅनर किलिंग) असू शकतो, असे पत्र लिहिले नसते तर ही घटना कधीच समोर आली नसती. उप पोलीस महासंचालक अबु बकर खुदा बक्ष यांनी केलेल्या चौकशीत तिचा खून झाल्याचे म्हटले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात समिआवर बलात्कार झाल्याचे व तिच्या शरीरात सापडलेले वीर्य हे तिचा माजी पती शकील याच्या डीएनएशी जुळणार असल्याचे बक्ष यांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला सांगितले. शकील आणि समिआचे वडील चौधरी शाहीद सध्या पोलीस कोठडीत आहेत. (वृत्तसंस्था)