कोर्टापुढे हजर न झाल्याने मुशर्रफ यांना निवडणूकबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:51 AM2018-06-15T05:51:21+5:302018-06-15T05:51:21+5:30
गेली दोन वर्षे दुबईत वास्तव्य करणारे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ कोर्टापुढे हजर न झाल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेची १२ जुलै रोजी होणारी निवडणूक लढण्यास त्यांना आधी दिलेली मुभा गुरुवारी रद्द केली.
इस्लामाबाद - गेली दोन वर्षे दुबईत वास्तव्य करणारे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ कोर्टापुढे हजर न झाल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेची १२ जुलै रोजी होणारी निवडणूक लढण्यास त्यांना आधी दिलेली मुभा गुरुवारी रद्द केली.
उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना २०१३ मध्ये निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. त्याविरुद्ध मुशर्रफ यांचे अपील सर्वोच्च न्यायालयात आहे. संसदेची निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांच्या वकिलांनी बंदी तात्पुरती उठवून त्यांना निवडणूक लढवू द्यावी, अशी विनंती केली. सरन्यायाधीश मियाँ सादिब निसार यांच्या खंडपीठाने अशी अंतरिम मुभा दिली होती. ते आल्यास त्यांना अटक होणार नाही ही खात्रीही दिली. पण ते आले नाहीत. त्यांनी आणखी वेळ मागितली. पण आदेशानुसार ते न आल्यामुळे निवडणूक लढविण्यास मुभा देणारा अंतरिम आदेश रद्द केला. यामुळे मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्ज आता बाद होईल. (वृत्तसंस्था)
तिन्ही खटल्यांत फरार
माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा खटला, राष्ट्राध्यक्ष असताना राज्यघटना गुंडाळून ठेवून देशात आणीबाणी लागू करणे व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना नजरकैदेत टाकणे याबद्दलचा देशद्रोहाचा खटला आणि लाहोरच्या लाल मशिदीच्या इमामाच्या खुनाचा खटला अशा तीन खटल्यांमध्ये मुशर्रफ आरोपी आहेत.
या तिन्ही खटल्यांमध्ये वॉरन्ट काढूनही हजर न झाल्याने त्यांना फरार घोषित केले गेले आहे.