काश्मीरमधील लष्कराचे दहशतवादी देशभक्त, लष्करसोबत आघाडी करणार - मुशर्रफ बगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 11:53 AM2017-12-17T11:53:42+5:302017-12-17T11:54:00+5:30
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे.
कराची - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे. तसेच भारतविरोधी कारवाया करून काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवणाऱ्या लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांबरोबर निवडणुकीसाठी युती करणार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. लष्कर आणि जमात उल दावा या दहशतवादी संघटना देशभक्त असल्याचा उल्लेखही मुशर्रफ यांनी केला आहे.
पाकिस्तामधील एआरवाय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावा या संघटनांशी आघाडी करण्याचे संकेत दिले. " आतापर्यंत या दोन्ही संघटनांनी आघाडीसाठी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र त्यांना माझ्यासोबत यायचे असल्यास माझी त्याला ना नसेल. मी उदारमतवादी आहे, पण त्याचा अर्थ मी धार्मिक कल असलेल्या लोकांच्या विरोधात आहे, असा होत नाही. मी लष्कर ए तोयबाचा समर्थक आहे. तसेच लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावाचे लोकांना मी आवडतो, याचीही मला जाणीव आहे."
याआधी लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक हाफिज सईदचे आपण सर्वात मोठे समर्थक असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ (७४) यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. काश्मिरात भारतीय सैन्याकडून दडपशाही सुरू असून त्या विरोधात लढणाºया अतिरेकी संघटनांच्या भूमिकेचे आपण समर्थन करतो, असेही ते म्हणाले होते. सईद ज्या प्रकारे काश्मीरशी संलग्न आहे, त्याचे मी समर्थन करतो. अलीकडेच मुशर्रफ यांनी २३ पक्षांची आघाडी केली आहे. जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्याची दडपशाही करत असल्याचा आरोप ते सातत्याने करीत आले आहेत.
‘जमात-उद-दावा’ मला मान्य
ते म्हणाले की, लष्कर-ए-तोयबा सर्वात मोठी ताकद आहे. सईदची दहशतवादी संघटना ‘जमात-उद-दावा’ मला मान्य आहे. तोयबावर पाकिस्तानात बंदी आहे आणि मुशर्रफ सरकारनेच हा निर्णय घेतला होता. याविषयी विचारता ते म्हणाले की, संघटनेवर बंदी आणली होती तेव्हाची ‘परिस्थिती’वेगळी होती.