मस्क म्हणतात, मी १० मुलांचा बाप; तुम्हीही व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:03 AM2022-07-09T08:03:43+5:302022-07-09T08:04:36+5:30
जगातील गर्भश्रीमंत, टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क कायम कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात.
जगातील गर्भश्रीमंत, टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क कायम कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात. कधी त्यांच्या कर्तृत्वानं, कधी त्यांनी विविध कंपन्या आपल्या पंखाखाली घेतल्यानं, कधी त्यांच्या प्रेमप्रकरणानं, कधी त्यांच्या मैत्रिणींवरून, कधी त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांवरून, कधी मुलांच्या नावांवरून, कधी त्यांच्या लग्नांवरून तर कधी त्यांच्या घटस्फोटांवरून...
आताही एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आहेत, ते त्यांच्या दहाव्या मुलावरून. त्यांची पहिली पत्नी कॅनेडियन लेखिका जस्टिन विल्सन. कॅनडाच्या ओंटारिओ येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थीदशेतच त्यांची आणि जस्टिन यांची पहिली भेट झाली. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि २०००मध्ये त्यांनी लग्न केलं. २००२मध्ये त्यांना पहिलं मूल झालं. मस्क आणि जस्टिन यांची एकूण सहा मुलं. त्यातील नेवाडा हा पहिला मुलगा जन्मल्यानंतर काही महिन्यांतच दगावला. बाकी पाच मुलांमध्ये जुळ्या आणि तिळ्यांचा समावेश आहे. एलन मस्क आणि त्यांची गर्लफ्रेंड शिवॉन झिलीस यांनी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०२१मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. ही जुळी मिळून त्यांना एकूण दहा मुलं.
एलन मस्क यांनी आपलं खासगी आयुष्य नेहेमीच आपल्यापुरतं ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी ते जगापासून कधीच लपून राहिलं नाही. आताही आपल्या मैत्रिणीपासून झालेल्या मुलांची बातमी त्यांनी आपल्यापुरतीच ठेवली होती. पण, योगायोगानं ही बातमी फुटली. न्यायालयात अलीकडेच त्यांनी जी याचिका दाखल केली होती, त्यातून त्यांना आता परत दोन मुलं झाल्याची बाब उघडकीस आली. एप्रिल २०२२मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत आपल्या जुळ्या मुलांची नावं बदलण्याची विनंती त्यांनी केली होती. या याचिकेनुसार या जुळ्या मुलांच्या नावाच्या शेवटी वडिलांचं नाव आणि मुलांच्या नावाच्या मध्ये आईचं नाव जोडण्याची विनंती त्यांनी केली होती. अलीकडेच न्यायालयानं त्यांची ही विनंती मान्य केली आहे. या याचिकेमुळेच मस्क हे आतापर्यंत दहा मुलांचे बाप असल्याची बातमी जगाला कळली.
मस्क यांना पहिली सहा मुलं त्यांची पत्नी जस्टिन यांच्यापासून झाली. २००८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दोन वर्षांनंतर मस्क यांनी अभिनेत्री तालुला रिले हिच्याशी लग्न केलं. विशेष म्हणजे तालुला हिच्याशी मस्क यांनी दोनदा लग्न केलं आणि दोन्ही वेळेस घटस्फोट घेतला. त्यांचं पहिलं लग्न २०१० ते २०१२ पर्यंत आणि दुसरं लग्न २०१३ ते २०१६पर्यंत टिकलं. या लग्नापासून त्यांना कोणतंही अपत्य झालं नाही.
२०१८ मध्ये मस्क आणि गायिका-गीतकार ग्रिम्स (तिचं मूळ नाव क्लॅरी बूचर) यांची दोस्ती झाली. त्यांनी २०२० मध्ये आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. भेटीच्या तीन वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये त्यांनी आपल्या मैत्रीला रामराम ठोकला, पण ग्रिम्सनं मार्च २०२२ मध्ये एका मुलाखतीत जाहीर केलं, मी आणि एलन मस्क नंतर पुन्हा एकत्र आलो आणि सरोगसीद्वारे आम्ही एका बाळाला जन्म दिला आहे. आम्ही आणखी तीन ते चार बाळांना तरी जन्म द्यायचं ठरवलं आहे. पण, त्यानंतर काही दिवसांतच ग्रिम्सनं ट्विट केलं, आमच्या ‘दोस्ती’ला आम्ही पुन्हा पूर्णविराम दिला आहे..
मस्क यांनीही त्यावेळी आम्ही ‘सेमी सेपरेट’ झालो आहोत, असं जाहीर केलं होतं. मस्क यांचं हे आठवं मूल. त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी बातमी आली ती या जुळ्यांचीच. एलन मस्क यांची नवी मैत्रीण शिवॉन झिलीस हिच्यापासून झालेली ही मुलं. मस्क यांनी स्थापन केलेल्या न्यूरालिंक या स्टार्ट्अपमध्ये शिवॉन टॉप एक्झेक्युटिव्ह आहे. एलन मस्क सध्या ५१ वर्षांचे आहेत, तर त्यांची मैत्रीण शिवॉन ३६ वर्षांची..
..नाहीतर मानवी संस्कृतीच कोसळेल!
एलन मस्क आपल्या ‘फॅमिली’विषयी कधीच फारशी वाच्यता करीत नाहीत, पण लोकांनी अधिक मुलं जन्माला घालावीत, जन्मदर वाढवावा, असं आपलं मत मात्र त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं आहे. मस्क म्हणतात, मानवी सभ्यता आणि संस्कृतीसाठी सध्या असलेला सर्वांत मोठा धोका म्हणजे जगभरात झपाट्यानं कमी होत चाललेला जन्मदर. माझे शब्द लिहून ठेवा, लोकांना जास्त मुलं नसतील, तर ही संस्कृती एक दिवस कोसळेल.. त्यांचे शब्द आहेत, ‘इफ पीपल डोण्ट हॅव मोअर चिल्ड्रन, सिव्हिलायझेशन इज गोइंग टू क्रम्बल, मार्क माय वर्डस..’