दहशतवादाविरुद्ध मुस्लिम देशांचा एल्गार
By admin | Published: December 16, 2015 04:06 AM2015-12-16T04:06:48+5:302015-12-16T04:06:48+5:30
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन ३४ देशांची संयुक्त लष्करी आघाडी स्थापन केली आहे. इजिप्त व तुर्कस्तानसह मध्य पूर्व, आशिया व आफ्रिकेतील प्रमुख देशांचा समावेश
रियाध : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन ३४ देशांची संयुक्त लष्करी आघाडी स्थापन केली आहे. इजिप्त व तुर्कस्तानसह मध्य पूर्व, आशिया व आफ्रिकेतील प्रमुख देशांचा समावेश आघाडीत असून सौदी अरेबियामध्ये आघाडीचे मुख्यालय असेल. इराण, सिरिया व इराक यांना आघाडीत स्थान मिळालेले नाही. हे तिन्ही देश सौदीचे विरोधक मानले जातात.
सौदी प्रेस एजन्सीने ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, दहशतवादाला समूळ नष्ट केले पाहिजे, म्हणून सौदीने नेतृत्व स्वीकारून हे पाऊल उचलले आहे. जगाचा विध्वंस व भ्रष्टाचार यांना इस्लाममध्ये अजिबात स्थान नाही, असा उल्लेख करून निवेदनात म्हटले आहे की, पण दहशतवादामुळे मानवी हक्कांची पायमल्ली विशेषत: मानवाचा जगण्याचा व सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. हे मानवतेच्या विरुद्ध आहे.
या आघाडीमध्ये लष्करी सामर्थ्य असलेले पाकिस्तान, तुर्की व इजिप्तसारखे देश व संघर्षरत असलेले लिबिया व येमेन तसेच माली, चाड, सोमालिया, नायजेरियासारखे दहशतवादाला तोंड देत असलेले देश आहेत.
इराणसारखा महत्त्वाचा देश आघाडीत नाही. सिरिया व येमेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात सौदी व इराण एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. येमेनमधील शिया हुती बंडखोर सौदीच्या निशाण्यावर आहेत, तर इराक व सिरियात इसिसविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकन पुढाकाराने बनलेल्या संयुक्त आघाडीचा सौदी अरेबिया एक घटक आहे.सौदीचे उपराजपुत्र व संरक्षणमंत्री मोहंमद सलमान यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करताना ही आघाडी सुन्नी दहशतवादाचा सामना करील, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी इतर देशांना मदत करील. सध्या प्रत्येक मुस्लिम देश दहशतवादाशी एकेकटा लढतो आहे, त्यामुळे सर्वांचे मिळून प्रयत्न होणे याला महत्त्व आहे.
मालदीव, बहारीन हे छोटे देश आघाडीत आहेत, तर कुवैत, कतार व संयुक्त अरब अमिरात हे आखाती देशही त्यात आहेत. सौदी अरेबियाचा शेजारी ओमान मात्र यात नाही. (वृत्तसंस्था)
कोणत्याही अतिरेकी हल्ल्याचा मुकाबला
सौदीचे उपराजपुत्र सलमान म्हणाले की, इराक, सिरिया, लिबिया, इजिप्त व अफगाणिस्तान आदी देशांमध्ये इसिसच नव्हे, तर अन्य कोणीही दहशतवादी हल्ला केला तर त्याचा मुकाबला केला जाईल.
ओबामांचा इसिसला इशारा... तुमची वेळ आली
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्याचा पुनरुच्चार करीत, इसिस नेत्यांना ठार करून मध्य पूर्वेतील त्यांच्या ताब्यातील प्रदेश मिळविण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. पेंटॅगॉनमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते म्हणाले की, आम्ही त्यांचा पूर्वीपेक्षा अधिक कठोरपणे मुकाबला करणार आहोत.
सन बेर्नार्डीनो हल्ल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा हा विचार बोलून दाखविला. आम्ही त्यांना समूळ नष्ट करणार आहोत, जेणेकरून जगभरात त्यांची दहशत व प्रचार होणार नाही.
अमेरिकन म्हणतात, इसिसविरुद्ध कठोर भूमिका घ्या!
वॉशिंग्टन : दहशतवादी हल्ले विचारात घेता इसिसबाबत कठोर भूमिका घ्यावी व त्यांचा मुकाबला करण्यासाठी सैन्य पाठवावे, असे मत निम्म्यापेक्षा थोडे कमी अमेरिकन नागरिक व्यक्त करीत आहेत. असोसिएट प्रेस व जीएफके यांच्या संयुक्त पाहणीत ही बाब आढळून आली.
गेल्या वर्षीच्या पाहणीत ३१ टक्के लोक सैन्य पाठवावे असे म्हणत. ही संख्या आता ४२ टक्क्यांवर गेली आहे. इसिसचा मुकाबला करण्यासाठी सैन्याने अधिक काही केले पाहिजे असे मत ५६ टक्के लोकांचे आहे. गेल्या वर्षी हा आकडा ४६ टक्के होता. दहापैकी सहा रिपब्लिकन व दहापैकी तीन डेमोक्रॅटस् अधिक सैन्य धाडावे अशा मताचे आहेत.