मुस्लिम, हिलेरी समर्थकांना शस्त्र विकणार नाही : अमेरिकेत नवा वाद
By admin | Published: October 31, 2016 06:35 PM2016-10-31T18:35:56+5:302016-10-31T19:01:47+5:30
मुस्लिम आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्रविक्री केली जाणार नाही, अशी जाहिरात केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि 31 - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेले वादविवाद ही आता नित्याचीच बाब बनली आहे. आता मुस्लिम आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्रविक्री केली जाणार नाही, अशी जाहिरात एका शस्त्रविक्रेत्याने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पेनिसिल्वानियामधील जॅक्सन सेंटर भागात अल्ट्रा फायरआर्म्स नावाचे दुकान चालवणाऱ्या पॉल चांडलर या शस्त्रविक्रेत्याने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. "आम्ही दहशतवाद्यांना शस्त्र विकणे सुरक्षित समजत नाही," असे या जाहिरातीत म्हटले आहे. या 54 वर्षीय शस्त्र विक्रेत्याने तसा फलकच आपल्या दुकानासमोर लावला आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये मुस्लिम आणि हिलेरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्र विकली जाणार नाहीत. असा स्पष्ट उल्लेख केला आहे. आपल्या स्टॉलवर शस्त्र खरेदीसाठी येणाऱ्या मुस्लिम ग्राहकांना आम्ही माघारी धाडतो. तसेच हिलेरीच्या समर्थकांनाही आशाच प्रकारे माघारी पाठवले जाते, असे पॉल चांडलर सांगतो.