‘त्यांच्या’ आदेशावरून माझे अपहरण; पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा लष्करावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 06:52 AM2023-05-15T06:52:00+5:302023-05-15T06:52:26+5:30
शनिवारी लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून देशाला संबोधित करताना खान यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) त्यांच्यावर केलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला.
लाहोर : न्यायालयाने सुटका केल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करावर हल्लाबोल केला. लष्करप्रमुखांच्या आदेशावरून माझे अपहरण करण्यात आले होते. त्यांना राजकारणात भाग घेतल्याची लाज वाटली पाहिजे. राजकारण करायचे असेल तर राजकीय पक्ष काढा ना, अशा शब्दांत इम्रान यांनी लष्कराची पिसे काढली.
शनिवारी लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून देशाला संबोधित करताना खान यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) त्यांच्यावर केलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाचा प्रवक्ता जेव्हा जन्मालाही आला नव्हता, तेव्हा मी जगात पाकचे प्रतिनिधित्व केले, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
“मी पाकचा झेंडा जगभर उंच ठेवला आहे. आयएसपीआरने असे विधान कधीच केलेले नाही. तुम्हाला स्वतःची लाज वाटायला हवी. तुम्ही राजकारणात उडी घेतली आहे. तुम्ही राजकीय पक्ष का स्थापन करत नाही”, असा भडीमार त्यांनी केला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सर्व १४५ खटल्यांत दिलासा दिल्यानंतर खान यांनी एक तास देशाला संबोधित केले.
तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता...
आयएसपीआरचे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी इम्रान यांना “ढोंगी” म्हटले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना इम्रान म्हणाले, “माझे ऐका मिस्टर डीजी आयएसपीआर...मी जगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करून त्यातून देशाचे चांगले नाव करत असताना तुमचा जन्मही झाला नव्हता. मला ढोंगी व लष्करविरोधी म्हटल्याबद्दल तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे,” असे इम्रान म्हणाले.