माझ्या मंत्रिमंडळात निम्म्या महिला असतील -हिलरी
By admin | Published: April 27, 2016 04:45 AM2016-04-27T04:45:08+5:302016-04-27T04:45:08+5:30
आपली राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यास आपल्या मंत्रिमंडळात निम्मी संख्या महिलांची असेल, असे डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन : आपली राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यास आपल्या मंत्रिमंडळात निम्मी संख्या महिलांची असेल, असे डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
मेरीलँड, डेलवर, पेनसिल्वेनिया, कनेक्टिकट आणि रोड आयलँड या पाच राज्यांत होणाऱ्या महत्त्वपूर्ण प्राथमिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एमएसएनबीसी टाऊन हॉलमध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या मंत्रिमंडळात अमेरिकेचे खरे प्रतिनिधित्व असेल. अमेरिकेची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे, बरोबर आहे ना! हिलरी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय अमेरिकन नीरा टंडन यांचा समावेश व्हावा, असे आपणास वाटते, असे हिलरींच्या प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक जॉन पोडेस्टा यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यानंतर हिलरी यांनी वरील प्रतिपादन केले. (वृत्तसंस्था)
नीरा १४ वर्षांहून अधिक काळापासून हिलरींसोबत काम करत आहेत. सध्या त्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या विचारगटाच्या प्रमुख आहेत. नीरा यांच्या नेतृत्वाखालील या विचारगटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख बनवली आहे. हिलरी म्हणाल्या की, महिलांचा अधिकार मानवाधिकार आहे. हिलरी यांनी प्रचार मोहिमेत महिला धोरणांवर भर दिला आहे. महिलांना समान वेतन दिले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.