'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 08:35 PM2024-10-16T20:35:37+5:302024-10-16T20:36:30+5:30
कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे.
India-Canada Relation : भारत आणि कॅनडामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. पन्नू याने दावा केला की, गेल्या तीन वर्षांपासून तो ट्रूडोशी थेट संपर्कात आहे आणि त्यानेच भारताविरोधातील माहिती पुरवली, ज्या आधारे ट्रूडो यांनी कारवाई केली.
पन्नूने कॅनडातील सीबीसी न्यूजशी बोलताना तीन वर्षांपासून पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. यासोबतच भारताविरोधात माहिती दिल्याचेही सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले. या हत्येप्रकरणी कॅनडा सतत भारतावर गंभीर आरोप करत आहे.
पन्नू काय म्हणाला?
दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख पन्नू म्हणाला की, "पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान न्याय, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी कॅनडाची वचनबद्धता दर्शवते. शिख फॉर जस्टिस गेल्या 3 वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयासोबत जवळून काम करत आहे आणि त्यांना सातत्याने गुप्तचर नेटवर्कची माहिती पुरवत आहे. आमच्या संस्थेने कॅनडा पीएमओला सांगितले होते की, भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि त्यांचे सहकारी हरदीप सिंग निज्जरची हत्या करणाऱ्या भारतीय एजंटना रसद आणि गुप्तचर माहिती पुरवत आहेत."
🚨SHOCKING: 🇨🇦Canadian state media CBC provides a platform to Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun to promote anti-India🇮🇳 misinformation 👇 pic.twitter.com/Zi1AzOEOnd
— Sputnik India (@Sputnik_India) October 16, 2024
पन्नू पुढे म्हणाला, "आम्ही आमच्या गुरुंच्या आशीर्वादाने आयुष्य जगत आहोत. आपला जन्म ज्या दिवशी होतो, त्याच दिवशी मृत्यूची तारीख लिहिली जाते. त्यामुळे मी भारताकडून येणा-या हत्येच्या धमक्या किंवा भारत सरकारकडून माझ्याविरुद्ध रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाला घाबरत नाही. पण, शेवटी मी जिवंत असेल, तेव्हाच खलिस्तानी मोहीम राबवू शकेन. त्यामुळे मी स्वत:ला सुरक्षित ठेवता यावे आणि जगभरात खलिस्तानी मोहीम सुरू ठेवता यावी यासाठी सर्व सुरक्षा उपाय करत आहे," असेही तो यावेळी म्हणाला.
भारताची कॅनडावर कारवाई
निज्जरच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याचा आरोप कॅनडा करत आहे, त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशातच, 14 ऑक्टोबर रोजी भारताने कॅनडामधील उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अदिकाऱ्यांना परत बोलावल्याने संबंध अधिक बिघडले. निज्जरच्या हत्येच्या तपासात वर्मा आणि इतर उच्चायुक्तांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. विशेष म्हणजे, भारतानेही सहा कॅनेडियन उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे.