माझे पती कठोर, पण उदार अन् दयाळू
By admin | Published: July 20, 2016 05:35 AM2016-07-20T05:35:17+5:302016-07-20T05:35:17+5:30
रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया यांनी ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले पैलू मांडले
क्लिवलॅण्ड (अमेरिका) : अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया यांनी ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले पैलू मांडले. माझे पती उदार अंत:करणाचे व दयाळू आहेत, असे त्या म्हणाल्या.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात बोलताना त्यांनी ट्रम्प यांच्या कठोर प्रतिमेला थोडे मुलायम करण्याचा प्रयत्न केला. ‘ट्रम्प कधीही अमेरिकी नागरिकांना निराश करणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भावनिक सादही घातली. जेव्हापासून मी ट्रम्प यांना ओळखते, तेव्हापासूनचे सांगते त्यांना नेहमीच राष्ट्राची चिंता असते. ते देशात आमूलाग्र आणि शाश्वत स्वरूपाचा बदल घडवून आणतील, असे मला मनापासूनवाटते. हे संमेलन चार दिवस चालणार असून, त्यात रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होणार आहे.
ट्रम्प म्हणाले की, मिलेनिया शानदार प्रथम महिला ठरतील. मिलेनिया या ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. पतीची नेतृत्व क्षमता आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देतानाचा त्यांचा ठामपणा याबद्दल मिलेनिया भरभरून बोलल्या. (वृत्तसंस्था)
>...म्हणून त्यांच्यावर पे्रम जडले
मिलेनिया म्हणाल्या की, ‘डोनाल्ड निष्ठावान असून माघार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. एखादा प्रकल्प पूर्ण करण्यास किंवा सुरू करण्यास त्यांना अनेक वर्षे संघर्ष करताना मी पाहिले आहे. ते माघार घेत नाहीत. तुम्हाला जर अशी व्यक्ती हवी असेल, तर मी हमी देऊ शकते की, ट्रम्प अगदी तसेच आहेत.
ट्रम्प कठोर आहेत; परंतु उदार, निष्पक्ष व काळजी घेणारेही आहेत. त्यांच्याशी प्रेम जडण्यात त्यांची उदारता हेदेखील एक कारण आहे.