म्यानमारच्या हवाई दलाचा भारतीय सीमारेषेजवळ हल्ला; 9 मुलांसह १७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:16 PM2024-01-10T15:16:33+5:302024-01-10T15:16:46+5:30
सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे.
म्यानमारच्या उत्तर पश्चिमेकडील एका गावात सैन्याने जोरदार हवाई हल्ला केला आहे. यामध्ये नऊ लहान मुलांसह १७ नागरिकांचा मृत्यू झाल आहे. तर २० लोक जखमी झाले आहेत. भारतीय सीमारेषेच्या अगदी जवळ असलेल्या सासांग प्रदेशातील खमपत शहराच्या कानन भागात सकाळी हा हल्ला करण्यात आला.
सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये आँग सान स्यू-की यांचे लोकांनी निवडलेले सरकार लष्करा उलथवून लावले होते. त्यानंतर अनेक संघटनांनी शस्त्रे हाती घेतली आहेत. तेव्हापासून देशाच्या मोठ्या भागात लष्कर आणि सशस्त्र संघटनांत संघर्ष सुरू आहे. दोन वर्षांत लष्करी सरकारने बंडखोरांवर हवाई हल्ले वाढवले आहेत.
बचाव कार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने वृत्तसंस्था एपीला ही माहिती दिली आहे. जेट फायटरने खंपतच्या बाहेरील कानन गावात तीन बॉम्ब टाकल्याचे यात म्हटले आहे. गावातील शाळा आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या 17 नागरिकांचा मृत्यू झाला. शाळेजवळील सुमारे 10 घरे बॉम्बमुळे उद्ध्वस्त झाली आहेत.