म्यानमार आणि भारताचं भावनिक नातं, दोन्ही देशांत कोणतीही सीमा नाही- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 09:03 PM2017-09-06T21:03:05+5:302017-09-06T21:08:49+5:30
म्यानमारमधील भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं आहे.
यंगोन, दि. 6 - म्यानमारमधील भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं आहे. म्यानमार आणि भारताचं भावनिक नातं, दोन्ही देशांत कोणतीही सीमा नाही, असं प्रतिपादन नरेंद्र मोदींनी केलं आहे. ते म्हणाले, लहानपणापासून एखाद्या धार्मिक आणि आध्यात्मिक शहरात जाण्याची माझी इच्छा होती. यंगोनमध्ये येऊन ते स्वप्न पूर्ण झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील म्यानमारची भूमिका, आझाद हिंद फौज आणि विपश्यनेचाही देखील उल्लेख केला आहे. तसेच बहादूर शाह जाफरला म्यानमारच्या धरतीत दफन केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. मोदींच्या भाषणावेळी अनेकांनी मोदींचा जयघोष केला. प्रवासी भारतीय हे परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. तसेच भारताचं नावही उंचावत आहेत. व्हिसा देण्यासाठी भारतीय दूतावासाचा दरवाजा 24 तास खुला असल्याचंही मोदी प्रवासी भारतीयांना उद्देशून म्हणाले.
आमचं सरकार दहशतवाद आणि सांप्रदायिकतेच्या विरोधात आहे. मोदी म्हणाले, दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार, सांप्रदायिकातमुक्त न्यू इंडिया बनवण्याचा निर्धार आहे. न्यू इंडियाच्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवासी भारतीयांनीही या मोहिमेत सामील व्हावं, असंही मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक आणि जीएसटीचाही उल्लेख केला आहे. आम्ही फक्त शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत नाही, तर भ्रष्टाचा-यांना पायबंद घालण्यासाठी नोटाबंदीसारखे निर्णयही घेतले. जीएसटीला गुड अँड सिम्पल टॅक्स म्हणत जीएसटीमुळे अनेक व्यवसाय हे कररचनेत आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. म्यानमारसोबतचे भारताचे संबंध आम्ही आणखी वृद्धिंगत करत आहोत. ट्रान्सपोर्ट कॉरिडोर, बॉर्डर करार आणि क्रास बॉर्डर मोटार व्हेईकल करारांतर्गत दोन्ही देशांमधील देवाणघेवाण वाढवणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.