भीषण, भयंकर, भयावह! भूकंपाने उद्ध्वस्त झालं म्यानमार; मृतांचा आकडा १७०० पार, ३४०८ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 17:10 IST2025-03-30T17:09:54+5:302025-03-30T17:10:30+5:30

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा १७०० वर पोहोचला आहे, तर शेजारील देश थायलंडमध्येही १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

myanmar devastated by earthquake death toll reaches 1700 more than 3400 injured | भीषण, भयंकर, भयावह! भूकंपाने उद्ध्वस्त झालं म्यानमार; मृतांचा आकडा १७०० पार, ३४०८ जखमी

भीषण, भयंकर, भयावह! भूकंपाने उद्ध्वस्त झालं म्यानमार; मृतांचा आकडा १७०० पार, ३४०८ जखमी

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा १७०० वर पोहोचला आहे, तर शेजारील देश थायलंडमध्येही १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपामुळे इमारती कोसळल्या, पूल कोसळले आणि रस्त्यांचं नुकसान झालं.

न्यूज एजन्सी एपीनुसार, जखमींची संख्या ३,४०८ वर पोहोचली आहे, तर १३९ लोक बेपत्ता आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू असताना मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

भूकंपाशी संबंधित ५ महत्त्वाचे अपडेट्स

मांडाले शहराचं सर्वात जास्त नुकसान 

१.७  मिलियन लोकसंख्या असलेल्या मांडाले शहराचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. ६.७ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक स्वतः मदत कार्यात गुंतले आहेत.

स्थानिक लोक ढिगारा हटवून शोधताहेत मृतदेह 

स्थानिक चहाच्या दुकानाचे मालक विन ल्विन यांनी सांगितलं की, त्यांच्या रेस्टॉरंटच्या ढिगाऱ्यात ७ जणांचा मृत्यू झाला.  एएफपीनुसार, ते विटा काढून मृतदेह काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना कोणीही जिवंत सापडेल अशी अपेक्षा नाही.

भारताने पाठवली मदत

भारताने म्यानमारला आवश्यक साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि बचाव पथकं पाठवली आहेत. मदत साहित्य घेऊन पाच लष्करी विमाने पोहोचली आहेत, ज्यात ८० सदस्यांची एनडीआरएफ टीम आणि एक लष्करी फील्ड हॉस्पिटलचा समावेश आहे. आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री यांच्यामार्फत मदत पाठवली जात आहे.

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता 

संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की, म्यानमारमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत. आधीच युद्धाचा सामना करणाऱ्या या देशात ३.५ मिलियन लोक विस्थापित झाले आहेत आणि उपासमारीचा धोका वाढला आहे. मदत संस्थांनी सांगितलं की, म्यानमार या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आपत्तीसाठी तयार नव्हतं.

थायलंडमध्येही विध्वंस, १७ जणांचा मृत्यू

भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली, त्यात किमान १७ जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले. ८३ लोक अजूनही बेपत्ता आहेत, जे ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे. 
 

Web Title: myanmar devastated by earthquake death toll reaches 1700 more than 3400 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.