म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 05:55 IST2025-04-01T05:55:10+5:302025-04-01T05:55:52+5:30

Myanmar Earthquake: म्यानमारमधील भयंकर भूकंपातील मृतांची संख्या १७००हून अधिक झाली. भूकंपाच्या तडाख्याने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बचाव कार्यादरम्यान सापडत आहेत.

Myanmar earthquake death toll rises to 1700, NDRF rescue operations underway | म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य

म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य

बँकॉक - म्यानमारमधील भयंकर भूकंपातील मृतांची संख्या १७००हून अधिक झाली. भूकंपाच्या तडाख्याने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बचाव कार्यादरम्यान सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती अधिकाऱ्यांनी सोमवारी व्यक्त केली. म्यानमारमध्ये मदतकार्यात सहभागी झालेल्या भारताच्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ)च्या जवानांनी सोमवारी इमारतींच्या ढिगाऱ्याखालून सात मृतदेह बाहेर काढले. 

म्यानमार सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन टुन यांनी सांगितले की,  हा भूकंप झाला तेव्हा विशिष्ट धर्मीय मोठ्या संख्येने प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थना करीत होते. त्यातील ७०० जण भूकंपामुळे मरण पावल्याची माहिती स्प्रिंग रिव्होल्युशन म्यानमार मुस्लीम नेटवर्कने दिली. भूकंपात ६० प्रार्थना स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. 

एनडीआरएफने मंडालेत काढले ७ मृतदेह बाहेर 
भारताच्या एनडीआरएफ पथकाने म्यानमारमध्ये मंडाले येथे भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून सोमवारी सात मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर या पथकाने कोसळलेल्या आणखी दहा इमारतींच्या ठिकाणी बचावकार्य सुरू केले. 
मंडालेतील सेक्टर डीमधील १३ इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची सुटका करण्याचे काम या पथकाला देण्यात आले. म्यानमारमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने ऑपरेशन ब्रह्माच्या अंतर्गत त्या देशाला मदतसामग्री पाठविली. तसेच एनडीआरएफ पथक पाठवून बचावकार्य सुरू केले. 
भूकंपामुळे संपूर्ण म्यानमारमध्ये दूरसंचार सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे किती भूकंपग्रस्त मरण पावले व किती जखमी झाले, यांची योग्य आकडेवारी मिळणे काहीसे कठीण बनले आहे.  

बँकॉकमध्ये गगनचुंबी इमारतींची तपासणी होणार
म्यानमारप्रमाणेच थायलंडमध्येही शुक्रवारी भूकंपाचे धक्के बसून मोठ्या प्रमाणावर हादरे बसलेल्या गगनचुंबी इमारतींची तपासणी करण्यात येणार आहे. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत भूकंपामुळे कोसळली. त्या शहराचे गव्हर्नर चाडचार्ट सिटीपंट यांनी त्या जागी भेट दिली. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा यंत्राद्वारे बाजूला करण्यात येत होता, असे त्यांना  आढळून आले. 

 

Web Title: Myanmar earthquake death toll rises to 1700, NDRF rescue operations underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.