म्यानमार भूकंप: नमाज अदा करणाऱ्यांवर मशिदीचे छत कोसळले, शेकडो लोकांचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:15 IST2025-03-29T20:15:13+5:302025-03-29T20:15:25+5:30
शुक्रवारी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भीषण भूकंप आला, ज्यामुळे आतापर्यंत 1600+ लोकांचा मृत्यू झाला आहे.

म्यानमार भूकंप: नमाज अदा करणाऱ्यांवर मशिदीचे छत कोसळले, शेकडो लोकांचा मृत्यू...
Myanmar Earthquake :म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2000 हून अधिक जखमी झाले आहेत. याशिवाय, हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो मुस्लिम नमाज अदा करत असताना अचानक मशिदी कोसळल्या. यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मशिदींचे छत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सर्वात जास्त परिणाम मंडाले आणि सागिंग भागात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके वेगाने आले की, मशिदींची छत कोसळू लागली, ज्यात अनेक नमाजकांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार या भूकंपात मंडाले आणि सागिंगमधील अनेक मशिदी उद्ध्वस्त झाल्या आहेत.
मंडाले येथे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, जेथे 50 हून अधिक मशिदी प्रभावित झाल्या आहेत आणि सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र, अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. बर्मा ह्युमन राइट्स नेटवर्कच्या मंग ला ना यांनी सांगितले की, सागिंगमध्ये मदतकार्यात गुंतलेले अनेक तरुणही या दुर्घटनेचे बळी ठरले. या घटनेनंतर अनेक देश म्यानमारच्या मदतीसाठी सरसावले आहेत.