म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला, लहान मुले व महिलांसह 100 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:08 AM2023-04-12T09:08:01+5:302023-04-12T09:11:37+5:30

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्कराने बंड करून सत्ता मिळवली. यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली

Myanmar military airstrikes in Sagaing region, 100 people feared dead | म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला, लहान मुले व महिलांसह 100 लोकांचा मृत्यू

म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला, लहान मुले व महिलांसह 100 लोकांचा मृत्यू

googlenewsNext

बँकॉक : म्यानमारच्या (Myanmar) लष्कराने मंगळवारी मध्य म्यानमारमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात (Air Strike) अनेक मुलांसह 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक लष्करी राजवटीच्या विरोधकांद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या हल्ल्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी अस्वस्थ करणारी आहेत. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्राने (UN) सुद्धा निषेध केला आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने द असोसिएटेड प्रेसला सांगितले की, एका लढाऊ विमानाने सागिंग प्रांतातील कानबालू टाउनशिपमध्ये असलेल्या पाजिगी गावाबाहेर जमलेल्या जमावावर बॉम्ब टाकला आणि नंतर हेलिकॉप्टरमधून गोळीबार केला. बंडखोर गटाच्या स्थानिक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येथे लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, हा प्रांत मंडालेच्या उत्तरेस 110 किलोमीटर (70 मैल) अंतरावर आहे, हे देशातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.

प्राथमिक रिपोर्टमध्ये मृतांची संख्या जवळपास 50 असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु स्वतंत्र मीडियाच्या रिपोर्टनुसार, मृतांची संख्या 100 पेक्षा जास्त असल्याचे सांगितले. या घटनेच्या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करणे अशक्य होते, कारण तेथील लष्करी सरकारने रिपोर्ट देण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

लष्करी सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सरकारी टेलिव्हिजनला दिलेल्या फोन स्टेटमेंटमध्ये हल्ल्याबाबत दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, बंडखोर गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान हा हल्ला करण्यात आला. तसेच, त्यांनी सरकारविरोधी शक्तींवर दहशतवादाची हिंसक मोहीम चालवल्याचा आरोप केला.

लष्कराने बंड करून सत्ता मिळवली
म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्कराने बंड करून सत्ता मिळवली. यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली. यादरम्यान, म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की आणि नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर लोकशाही बहाल करण्याच्या मागणीसाठी देशभरात निदर्शने झाली. तेव्हापासून लष्कराच्या हातून 3,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Myanmar military airstrikes in Sagaing region, 100 people feared dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.