म्यानमारच्या खाणीत मिळाला १७५ टनांचा पाचू!

By admin | Published: October 18, 2016 04:55 AM2016-10-18T04:55:05+5:302016-10-18T04:55:05+5:30

उत्तर म्यानमारच्या (ब्रह्मदेश) काचिन राज्यातील मौल्यवान खड्यांच्या एका खाणीत तब्बल १७५ टन वजनाचा पाचूचा दगड सापडला

Myanmar mine got 175 tons of pooja! | म्यानमारच्या खाणीत मिळाला १७५ टनांचा पाचू!

म्यानमारच्या खाणीत मिळाला १७५ टनांचा पाचू!

Next


यांगून (रंगून) : उत्तर म्यानमारच्या (ब्रह्मदेश) काचिन राज्यातील मौल्यवान खड्यांच्या एका खाणीत तब्बल १७५ टन वजनाचा पाचूचा दगड सापडला, तेव्हा खाण कामगार थक्क झाले.
हा पाचूचा दगड साधारण दोन लहान आकाराच्या घरांएवढा असून त्याची उंची ९ फूट व लांबी १८ फूट आहे. आजच्या बाजारभावाने याची किंमत सुमारे १७ कोटी अमेरिकन डॉलर (अंदाजे १,१०० कोटी रुपये) होईल, असा अंदाज आहे.
वजनाचा विचार केला तर जगात आजवर खाणीतून काढला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वजनदार पाचूचा दगड आहे. चीनमधील जेड बुद्धा पॅलेसमधील पहुडलेल्या बुद्धाचा पुतळा ज्या अखंड पाचूच्या दगडातून कोरलेला आहे, तो जगातील सर्वात मोठा पाचूचा दगड मानला जातो. खाणीतून काढला तेव्हा त्याचे वजन २६० टन एवढे होते.
खाणीतून काढलेल्या पाचूच्या ओबडधोबड दगडापासून सुबक, आकर्षक आकाराचे पाचूचे मौल्यवान खडे व त्यापासून रत्नाभूषणे, पुतळे व अन्य कलावस्तू तयार करण्याचा मोठा उद्योग चीनमध्ये चालतो. हा काचिनचा पाचूही पुढील प्रक्रिया करण्यासाठी चीनला पाठविला जाईल.
लंडनच्या ‘डेली मेल’ने हे वृत्त दिले. ज्या खाण कामगारांनी हा पाचूचा दगड खणून काढला त्यांच्यापैकी एक साओ मिन म्हणाला, ‘आम्हाला जणू लॉटरी लागल्यासारखेच वाटले. पण ही देशाची संपत्ती आहे. हा आमच्या नेत्यांचा बहुमान आहे!’ही बातमी कळल्यावर खाणीला भेट देण्यासाठी आलेले स्थानिक लोकप्रतिनिधी उ टिंट सोए म्हणाले, ‘ आमचे सरकार सत्तेवर असताना हा बहुमोल पाचूचा दगड मिळावा हे आम्हा नागरिकांचे. आमच्या सरकारचे व आमच्या पक्षाचे भाग्यच म्हणावे लागेल.’
पृथ्वीच्या पोटात मिळणारे असे मौल्यवान दगड ही निसर्गाची किमया मानली जाते. अशीच किमया म्हणून अलीकडेच फिलिपिन्समध्ये सापडलेल्या ३४ किनो वजनाच्या मोत्याने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. १० वर्षांपूर्वी सापडलेला तो मोती गेल्या आॅगस्टमध्ये प्रथमच जाहीरपणे प्रदर्शित करण्यात आला होता. आता अचंबा म्हणून या काचिन पाचूने
त्या मोत्यालाही मागे टाकले
आहे. (वृत्तसंस्था)
>दारिद्र्य, विषमतेची खाण
साडेपाच कोटी लोकसंख्येच्या म्यानमारमध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाचे बहुतांश पाचूचे दगड (जेटाईट) सापडतात. सुमारे ५७ अब्ज डॉलर एवढे या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) असून निम्मी अर्थव्यवस्था मौल्यवान खड्यांच्या खाणींवर अवलंबून आहे. मात्र येथील जनता दारिद्र्य आणि आर्थिक विषमतेने ग्रासलेली असून, मानवी विकास निर्देशांकात म्यानमारचा क्रमांक जगातील १८७ देशांमध्ये १५० लागतो.

Web Title: Myanmar mine got 175 tons of pooja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.