म्यानमार विमान अपघात; 31 मृतदेह सापडले
By admin | Published: June 9, 2017 11:51 AM2017-06-09T11:51:30+5:302017-06-09T14:36:56+5:30
एकुण 31 मृतदेह समुद्राच्या बाहेर काढण्यात आले आहे
Next
ऑनलाइन लोकमत
रंगून, दि. 9 - म्यानमारमधील डवाई शहरापासून 218 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रात तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानातील लोकांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी म्हणजे घटनेच्या तिसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे. या शोधकार्यात एकूण 31 मृतदेह समुद्राच्या बाहेर काढण्यात आले आहे. अंदमानच्या समुद्रातून हे सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पाण्याबाहेर काढलेले 31 मृतदेह मुख्यत: महिला आणि लहान मुलांचे आहेत. म्यानमारमध्ये जोरदार पावसातच लष्कराकडून नौदलाची जहाजं, हेलिकॉप्टर्स आणि मासेमारी करणाऱ्या होड्यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी बचाव पथकाला 31 मृतदेह सापडले आहेत. यापैकी 21 महिलांचे मृतदेह, आठ लहान मुलांचे तर दोन पुरूषांचे मृतदेह आहेत, अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. समुद्राबाहेर काढलेले मृतदेह डवाईच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत.
म्यानमारमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. खराब वातावरणातसुद्धा मासेमारी करणाऱ्या होड्यांच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे.
7 जून रोजी दुपारच्या सुमारास 116 प्रवाशांना घेऊन जाणारं लष्करी विमान बेपत्ता झालं होतं. याबाबत लष्कर कार्यालय आणि विमानतळाच्या अधिका-यांनी अधिकृत माहिती दिली होती. मान्यमारमधील दक्षिणेकडील मायईक आणि रंगून शहरा लगतच्या परिसरात लष्करी विमान बेपत्ता झाल्याचं सांगितलं होते. या विमानात 105 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. डवाई शहराच्या आसपास विमान पोहचल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. ही घटना गुरूवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यासाठी लष्कराचं पथक रवाना झालं होतं.