बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या परतीच्या वाटेत म्यानमारचे भूसुरुंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:33 AM2017-09-07T09:33:36+5:302017-09-07T09:34:40+5:30
रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. राँ
ढाका, दि. ७- बांगलादेशात पळून गेलेल्या व नो मँन्स लँडमध्ये आश्रय घेणा-या रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. राँयटर्सला दिलेल्या माहितीत ढाकास्थित सूत्रांनी माहिती दिली आहे, तर राखिन प्रांताच्या मंत्र्यांनी भूसुरुंग पेरण्यासारखी कृत्ये आम्ही करत नाही असे सांगत हा आरोप फेटाळला आहे.
बांगलादेश व म्यानमारच्यामध्ये असणा-या तारेच्या कुंपणाला समांतर भूसुरुंग पेरण्याचे काम काही गट करत असल्याचे व त्याचे पुरावे व छायाचित्रे असल्याची माहिती बांगलादेशातील सूत्रांनी दिली आहे. तसेच बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांनी सोमवारी व मंगळवारी म्यानमारच्या दिशेने प्रत्येकी दोन भूसुरुंगाच्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सीमा ओलांडताना झालेल्या स्फोटात एका मुलाने आपला पाय गमावला आहे तर एका मुलास किरकोळ इजा झाल्या आहेत, या मुलांना बांगलादेशात उपचारास आणले गेले असता हा स्फोट भूसुरुंगाचा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
एका रोहिंग्याने स्फोटाच्या स्थळी जाऊन केलेल्या चित्रिकरणात दहा सेंमी व्यासाची धातूची चकती दिसून आली, त्यावरुनही म्यानमार सीमावर्ती प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सुरक्षा परिषदेने तात्काळ हस्तक्षेप करावा
म्यानमारमध्ये रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली असून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी विनंती ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि नोबेलविजेते महंमद युनुस यांनी केली आहे. अराकान प्रांतातील मानवी संकट आणि मानवतेविरोधात सुरु असलेल्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी तुमच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या खुल्या पत्रात युनूस यांनी लिहिले आहे. बलात्कार, हत्या, संपुर्ण खेडी जाळली जाणं यामुळं लोकांना घरदार सोडून परागंदा व्हावं लागत असल्याकडे युनूस यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.