चीनमधील मुलांमध्ये पसरला गूढ आजार; ‘डब्ल्यूएचओ’ सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:47 AM2023-11-24T05:47:40+5:302023-11-24T05:48:08+5:30
अनेक बालके आजारी; जग चिंतेत
बीजिंग : कोरोनाचे संकट दूर होते न होते तोच चीनमधून आणखी एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. तेथील बालकांत एक गूढ आजार पसरत असून, त्याची लक्षणे न्यूमोनियासारखीच आहेत. चीनकडून या आजाराचा तपशील मागवताना जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती उघड केली. यासोबतच चीन जगाला पुन्हा एकदा श्वसनाशी संबंधित एखाद्या भयंकर आजाराची देणगी देणार की काय, अशी भीतीही वाढत आहे.
या आजाराशी संबंधित बहुतांश रुग्ण ईशान्य चीन, बीजिंग आणि लिओनिंगमधील रुग्णालयांत दिसत आहेत. बाधित मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण यासारखी लक्षणे असून, कोरोनाची अशीच लक्षणे असतात. परंतु कोरोनाचा बालकांना फटका बसला नव्हता. बालकांमधील आताचे संक्रमण हे कोविडचेच नवे रुप आहे की, हा एखाद्या नवीन विषाणूचा प्रकोप आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची उत्पत्ती वुहान मार्केट किंवा चीनी प्रयोगशाळेत झाल्याचे मानले जाते. (वृत्तसंस्था)
‘डब्ल्यूएचओ’ सतर्क
मुलांमध्ये श्वसन रोग आणि न्यूमोनियाच्या संभाव्य चिंताजनक वाढीबद्दल माहिती देण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनला अधिकृत विनंती केली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले की, या प्रकरणांचा श्वसन संक्रमणाच्या वाढीशी संबंध आहे की नाही, हे स्पष्ट नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले की परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे; परंतु चीनमधील श्वसन रोगांच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ नवीन जागतिक उद्रेकाची सुरुवात दर्शवते याच्याशी ते सहमत नाहीत.