महागडा डायनॉसॉर, 2 अब्ज डॉलर्सना विकला सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 01:47 PM2018-06-07T13:47:10+5:302018-06-07T13:47:10+5:30
2013 साली अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतामध्ये जीवाश्मामध्ये हा सांगाडा सापडला होता.
पॅरिस- 9 मी लांब म्हणजेच जवळजवळ तीस फूट लांबीचा डायनॉसॉरच्या सांगाड्याचा लिलाव करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये हा लिलाव करण्यात आला. हा सांगाडा नक्की कोणत्या प्रकारच्या डायनोसोरचा आहे याची खात्री तज्ज्ञांना पटलेली नव्हती. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या या सांगाड्याने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
2013 साली अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतामध्ये जीवाश्मामध्ये हा सांगाडा सापडला होता. डायनोसोरच्या अभ्यासकांनी आजवर सापडलेल्या आणि उपलब्ध असलेल्या डायनोसोर सांगाड्यांपेक्षा हा सांगाडा वेगळा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
एका ब्रिटिश व्यक्तीने हा सांगाडा विकत घेतला असून आपण तो लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले.
याप्रकारे डायनोसोरचे सांगाडे जर लोकांनी विकत घेतले तर अभ्यास आणि संशोधनावर परिणाम होईल असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
भारतातही सापडला होता विचित्र डायनॉसॉर
डॉल्फिन आणि पाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले होते. भारतात इकथ्योसोरचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ होतीइकथ्योसोर या ग्रीक संज्ञेचा अर्थ मासा-पाल (फिश-लिझर्ड) असा होतो. हे अवशेष 152 दशलक्ष वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला
हे इकथ्योसोर डायनॉसोरच्या काळात पृथ्वीतलावर होते. त्याचे अनेक फॉसिल्स उत्तर अमेरिका आणि युरोपात सापडले होते. तसेच दक्षिण गोलार्धात ते केवळ दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सापडले होते. दिल्ली विद्यापिठामधील भूगर्भशास्त्रज्ञ गुंतुपल्ली प्रसाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, या प्राण्याचा फॉसिल सांगाडा भारतीय आणि जर्मन संशोधकांच्या चमूला मागच्या वर्षीच कच्छमध्ये सापडला होता. पण तेव्हा ता डायनॉसोरचा सांगाडा वाटला होता. मात्र नंतर पूर्ण सांगाडा खोदून काढल्यानंतर त्याची हाडे मोठी असल्याचे दिसून आले आणि तो भारतातील पहिला इकथ्योसोर असल्याचे लक्षात आले. कच्छमध्ये सापडलेला सांगाडा साधारणतः 5.5 मी लांब असून तो ऑप्थल्मॉसोरिड फॅमिलीतील आहे. या फॅमिलीतील प्राणी 165 ते 90 दशलक्ष वर्षांपुर्वी अस्तित्वात होते.