नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:26 PM2020-05-09T15:26:32+5:302020-05-09T15:31:10+5:30
सुरुवातीला वाटले कोणी अपंग व्यक्ती कार चालवत असावा. म्हणून एसयुव्हीच्या जवळ जाऊन पोलिसाने गाडीमध्ये मान उंचावून पाहिले तर सीटवर एक लहान मुलगा बसलेला दिसला.
मुलांना लहान वयात गाड्यांचा शौक असतो, पण तो खेळण्यांतील गाड्यांचा. पण अमेरिकाच्या उटाहमध्ये एक धक्कादायक पण तेवढीच हास्यास्पद घटना घडली आहे. एक पाच वर्षे वयाचा मुलगा खिशात केवळ ३ डॉलर एवढी 'भरघोस' रक्कम घेऊन बापाच्या एसयुव्हीतून चक्क लॅम्बॉर्गिनी खरेदी करण्यासाठी निघाला होता. पुढे काय घडले असेल...
खरेतर या मुलाचा लग्झरी कार खरेदी करण्याचा हट्ट होता. सारखा हट्ट करू लागल्याने त्याची आई या मुलाला खूप ओरडली. हे आईचे ओरडणे या मुलाला एवढे लागले की त्याने घरासमोर उभी असलेली एसयुव्ही स्टार्ट करून थेट लॅम्बॉर्गिनीच आणायची या उद्देशाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने चालवायला सुरुवात केली.
खरी गम्मत पुढे घडली. घरापासून ५ किमी या पठ्ठ्याने गाडी चालविली पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून आंतरराज्य महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसाने त्याला पाहिले. खरेतर चालकाशिवाय कार त्याला चालताना दिसत होती. म्हणून त्याने एसयुव्हीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. गाडीतही कोणी नाही आणि चालकाच्या सीटवरही कोणाचे डोके दिसत नसल्याने पोलीस मॉर्गन शॉक झाला.
सुरुवातीला वाटले कोणी अपंग व्यक्ती कार चालवत असावा. म्हणून एसयुव्हीच्या जवळ जाऊन पोलिसाने गाडीमध्ये मान उंचावून पाहिले तर सीटवर एक लहान मुलगा बसलेला दिसला. डोळ्यांवर विश्वास बसेना. मॉर्गनने त्याला कार कशी चालवायला शिकलास असे विचारले तर तो मुलगा घाबरला. पुढे त्याला कार थांबविण्यास सांगितले. या मुलाने कार थांबविली. पोलिसाने त्याची चौकशी केली असता आईने लॅम्बॉर्गिनी देण्यास नकार दिल्याने ती खरेदी करण्यासाठी कॅलिफोर्नियातील बहिणीकडे जात असल्याचे या मुलाने सांगितले.
या मुलावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आई-वडील ऑफिसला गेल्याची संधी साधून मोठ्या भावाची नजर चुकवत महाशय लॅम्बॉर्गिनी खरेदी करायला निघाले होते. खिशात तीन डॉलर आणि दीड कोटींची लॅम्बॉर्गिनी घेण्याचे स्वप्न साऱ्या प्रशासनाला हैरान करणारे होते.