नमाज नियमित अदा केली; तरच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ
By admin | Published: February 27, 2017 04:42 AM2017-02-27T04:42:53+5:302017-02-27T04:42:53+5:30
रोजची प्रार्थना (नमाज) नियमितपणे व वेळांची कटाक्षाने पालन करून केली तरच मिळणार आहे.
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ त्यांनी जर न्यायालय आणि न्यायालयाबाहेर रोजची प्रार्थना (नमाज) नियमितपणे व वेळांची कटाक्षाने पालन करून केली तरच मिळणार आहे.
पाकव्याप्त काश्मीरच्या सर्वोच्च न्यायालयाचे १२ वे मुख्य न्यायमुर्ती म्हणून इब्राहीम झिया यांनी शनिवारी शपथ घेतली. झिया यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रार्थनेच्या वेळांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश दिले, असे वृत्त ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने दिले. न्यायालयीन कर्मचारी नमाज नियमितपणे व वेळच्यावेळी अदा करतात की नाही यावर त्यांची वार्षिकवेतनवाढ अवलंबून आहे, असे झिया यांनी सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रार्थना करणे बंधनकारक केल्याचे जाहीर करताना सांगितले. यामुळे कर्मचारी रोजची प्रार्थना नियमितपणे व त्याच्या वेळा पाळून करतील व स्वत: काही प्रार्थनांचे नेतृत्व करतील, असे ते म्हणाले. कर्मचारी नियमितपणे प्रार्थना करतात की नाही यावर न्यायालयाचे गुप्तपणे लक्ष असेल. (वृत्तसंस्था)
>लक्ष कसे ठेवणार?
लोकांना वेगाने न्याय मिळावा यासाठी समर्पण भावनेने, प्रामाणिकपणे व नियमितपणे काम करण्याचा सल्ला झिया यानी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिला. न्यायालयाबाहेरील प्रार्थनेवर ते नेमके कसे लक्ष ठेवणार हे स्पष्ट नाही.