नामिबिया देशाने रचला इतिहास! नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांची पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 07:21 PM2024-12-04T19:21:29+5:302024-12-04T19:22:07+5:30
Netumbo Nandi-Ndaitwah, Namibia first female president : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांना ५७% पेक्षा जास्त मते मिळाली, तर पांडुलेनी इतुला यांना २६% मते मिळाली.
Netumbo Nandi-Ndaitwah, Namibia first female president : आफ्रिकेतील नामिबिया या छोट्याशा देशात मोठा बदल घडला. या देशाने नवा इतिहास रचला. नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांच्या रुपाने या देशाला पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मिळाल्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नंदी-नदैतावाह आता नामिबियाच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावर विराजमान होतील. त्या सत्ताधारी South West Africa People's Organisation म्हणजेच SWAPO पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनी या निवडणुकीत ५७% पेक्षा जास्त मते मिळवली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी पॅट्रियट्स फॉर चेंज (IPC) पक्षाच्या पांडुलेनी इतुला यांनी २६% मते मिळवली.
नामिबियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकारणात सक्रिय
स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असल्याने नंदी-नदैतवाह यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. नामिबियाला १९९० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. नंदी-नैदतवाह या नामिबियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खासदार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या देशाच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली आहेत. त्यांचा पक्ष SWAPO म्हणजेच दक्षिण पश्चिम आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन तेव्हापासून सत्तेत आहेत.
यंदा प्रस्थापितांविरूद्ध होती लाट, पण तरीही...
नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुका SWAPO पक्षासाठी कसोटीच्या होत्या. स्वातंत्र्य मिळवल्यापासून सलग ३४ वर्ष सत्तेवर टिकून राहिलेल्या SWAPO मधील प्रस्थापितांविरूद्ध मोठी लाट होती. त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या IPC ला तरुण पिढीकडून अधिक पाठिंबा मिळत होता. तरुण आयपीसी पार्टीला पाठिंबा देत होते कारण आयपीसी पार्टीने बेरोजगारी आणि सामाजिक असमानतेचा मुद्दा उचलला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन दिसेल अशी विरोधकांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तेथील जनतेने पुन्हा एकदा 'स्वापो'लाच बहुमत दिले.