नामिबियाचे राष्ट्रपती हेज गींगॉब यांचे कर्करोगाने निधन, वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 12:25 PM2024-02-04T12:25:43+5:302024-02-04T12:26:24+5:30
Hage Geingob : नामिबियाच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर गेल्या महिन्यात हेज गींगॉब यांनी आपल्याला कर्करोग झाल्याचे सांगितले होते.
Hage Geingob : नामिबियाचे राष्ट्रपती हेज गींगॉब यांचे रविवारी सकाळी निधन झाले. हेज गींगॉब यांनी ८२ व्या वर्षी विंडहोक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात नामिबियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. नामिबियाच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर गेल्या महिन्यात हेज गींगॉब यांनी आपल्याला कर्करोग झाल्याचे सांगितले होते.
कार्यवाहक राष्ट्रपती नांगोलो मुम्बा यांनीही राष्ट्रपतींच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दु:ख व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, "अत्यंत दु:ख आणि खेदाने मी सर्वांना कळवत आहे की, नामिबिया प्रजासत्ताकचे आमचे प्रिय डॉ. हेज गींगॉब यांचे आज निधन झाले." हेज गींगॉब यांच्यामागे त्यांची पत्नी मोनिका गींगॉब आणि तीन मुले आहेत.
गेल्या महिन्यात जेव्हा हेज गींगॉब यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात होती, तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याची बातमी पहिल्यांदा समोर आली होती. वैद्यकीय तपासादरम्यान त्यांच्या बायोप्सीमध्ये कर्करोगाच्या पेशी आढळून आल्या होत्या. निधनापूर्वी त्यांच्यावर विंडहोक येथील लेडी पोहंबा रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी २०१३ मध्ये त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. तर गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत त्यांच्यावर एऑर्टिकची शस्त्रक्रिया झाली होती.
हेज गींगॉब यांनी नामिबियाचे पंतप्रधान म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. याशिवाय सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवणारे ते तिसरे व्यक्ती होते. हेज गींगॉब यांचा जन्म १९४१ मध्ये उत्तर नामिबियातील एका गावात झाला होता. हेज गींगॉब हे ओवाम्बो समाजातील होते. नामिबियामध्ये निम्याहून अधिक लोकसंख्या ओवाम्बो समाजाची आहे. हेज गींगॉब यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास तीन दशके बोत्सवाना आणि युनायटेड स्टेट्समध्ये घालवली होती.