चीनच्या धमक्यांमध्ये नॅन्सी पेलोसी पोहोचल्या तैवानला, 22 विमानांनी केले एस्कॉर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 09:20 PM2022-08-02T21:20:30+5:302022-08-02T21:22:41+5:30
Nancy Pelosi Taiwan Visit : नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांच्या भेटीबाबत चीनने अमेरिकेला दिला आहे.
चीनच्या धमक्यांमध्ये अमेरिकेच्या (America) हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) तैवानमध्ये (Taiwan) पोहोचल्या आहेत. विमानतळावर तैवानच्या राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, तैवानला येताना 22 विमानांनी नॅन्सी पेलोसी यांना एस्कॉर्ट केले होते. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांच्या भेटीबाबत चीनने अमेरिकेला दिला आहे. या धमक्यांना न जुमानता, स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या आहेत.
जपानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या दौऱ्यापूर्वी 8 अमेरिकन लढाऊ विमाने आणि 5 इंधन भरणारी विमाने अमेरिकन लष्करी तळावरून उड्डाण केले होते. हे नॅन्सी पेलोसी यांच्या विमानाला पॅरामीटर संरक्षण देत होते. दरम्यान, नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चीनचा थयथयाट झाला आहे. चीनने तैवानवर सायबर हल्ला चढवल्याचे म्हटले जाते. तैवान सरकारची अधिकृत वेबसाइट डाऊन झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चीनने तैवान सरकारची वेबसाइट हॅक केली आहे. तैवान सरकारच्या वेबसाइटवर गेल्यास सध्या 502 Server Error असा मेसेज येत आहे. इतकेच नाही तर तैवान सरकारच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या वेबसाइटवरही सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | US aircraft carrying House of Representatives Speaker Nancy Pelosi lands in Taipei, Taiwan.
— ANI (@ANI) August 2, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/pOpl9NHaio
कडेकोट सुरक्षा
मंगळवारी तैपेई शहरातील ग्रँड हयात हॉटेलसमोर सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी या हॉटेलमध्ये राहणार आहेत. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी आणि त्यांचे सोबतचे शिष्टमंडळ मंगळवारी संध्याकाळी तैवानला पोहोचले असून रात्रभर याठिकाणी मुक्काम करतील. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी कोणतीही माहिती उघड करण्यास किंवा नॅन्सी पेलोसी तैवानला भेट देणार आहेत की नाही यावर टिप्पणी करण्यास नकार दिला होता.
अमेरिकेला चीनचा इशारा
अमेरिकेने जर तैवानमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम भोगावे लागतील असा उघड इशारा चीनने दिला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे शांती भंग होईन आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल असाही इशारा चीनने दिला आहे. चीनच्या इशाऱ्याला झुगारून नॅन्सी पेलोसी यांचा दौरा आज होत आहे. त्यामुळे येत्या काळात चीन आणि तैवान यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.