नॅन्सींच्या दौऱ्याने चीनचा संताप; अमेरिकेसोबत चर्चा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:07 AM2022-08-06T06:07:17+5:302022-08-06T06:07:35+5:30
पेलोसींचे प्रत्युत्तर; तैवानचा दौरा करण्यापासून चीन रोखू शकत नाही
टोकियो : अमेरिकी अधिकाऱ्यांना तैवानचा दौरा करण्यापासून चीन रोखू शकत नाही. तैवानला वेगळे पाडण्याचा प्रयत्न चीनला करता येणार नाही, असा इशारा अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी दिला आहे. पेलोसी यांच्या तैवान भेटीच्या निषेधार्थ चीनने अमेरिकेशी हवामान बदल, संरक्षण, अंमली पदार्थविरोधी कारवाई या विषयांवर सुरू असलेली चर्चा स्थगित केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतला तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
नॅन्सी पेलोसी यांनी नुकत्याच केलेल्या तैवानच्या दौऱ्याला चीनने तीव्र विरोध दर्शविला होता. पेलोसी म्हणाल्या की, तैवानमध्ये येणाऱ्यांवर बंधने लादण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तेथील सध्याची स्थिती बदलण्यासाठी नव्हे तर तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता नांदावी, यासाठी मी त्या देशाचा दौरा केला होता. तैवानने लोकशाहीसाठी मोठा संघर्ष केला आहे. इतकेच नव्हे तर विविध लोकांचे हक्क जपत स्वत:ची प्रगती साधली आहे. (वृत्तसंस्था)
निर्बंध प्रतीकात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत
nनॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या केलेल्या दौऱ्याच्या निषेधार्थ चीनने अमेरिकाविरोधी पाऊल उचलले आहे. त्या देशाशी काही मुद्द्यांवर सुरू असलेली चर्चा स्थगित केली आहे.
nअमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी व त्यांच्या
कुटुंबीयांवर चीनने लागू केलेले निर्बंध हे आणखी एक पाऊल आहे. मात्र, असे निर्बंध प्रतीकात्मक असतात, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ज्ञांचे मत आहे.
१०० चिनी लढाऊ विमानांची तैवानभोवती लष्करी कवायत
गेल्या दोन दिवसांपासून चीनने १०० लढाऊ विमाने व १० युद्धनौकांच्या साह्याने तैवानच्या परिसरात लष्करी कवायत सुरू केली आहे. तैवान हा आमचाच अविभाज्य भाग असल्याचा चीनचा दावा आहे. अमेरिकेने तैवानची बाजू घेतल्याने चीन नाराज झाला आहे. तैवान व त्याच्या पाठीराख्यांवर दबाव यावा, यासाठी चीनने या लष्करी हालचाली सुरू केल्या. तसेच त्या देशाच्या सामुद्रधुनीत काही ठिकाणी चीनने नव्या प्रकारची क्षेपणास्त्रे डागली. त्यात तैवानचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
पेलाेसी यांचे जपानमध्ये आगमन
तंत्रज्ञान, व्यवसायांमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्याउलट चीनने व्यापारविषयक करार, शस्त्रास्त्रांचा प्रसार, मानवी हक्क याविषयीचे नियम पायदळी तुडविले आहेत. गेल्या २५ वर्षांत तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी या अमेरिकी संसदेच्या पहिल्या सभापती आहेत. सिंगापूर, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरियाचा दौरा केल्यानंतर नॅन्सी पेलोसी यांचे जपानमध्ये आगमन झाले.