नरेंद्र मोदींनी पॅरिसमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 04:24 PM2019-08-23T16:24:33+5:302019-08-23T16:25:36+5:30
फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या अखेरीस पॅरिसमधील भारतीयांना संबोधित केले.
पॅरिस - फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या अखेरीस पॅरिसमधील भारतीयांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्समधील संबंध, आपल्या सरकारची कामगिरी यांचा लेखाजोखा मांडतानाच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक ठेव्याचाही उल्लेख केला. तसेच आठवडाभरावर आलेल्या गणेशोत्सवाचा धागा पकडत पॅरिसमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे कौतुक केले आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. त्यानंतर उपस्थितांनीही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यास सुरुवात केली.
मोदी म्हणाले की, ''गणेशोत्सव हा पॅरिसमधील सांस्कृतिक कार्यक्रमामधील महत्त्वाचा सण असल्याचे मला सांगण्यात आले. त्या दिवशी पॅरिस शहर जणू छोटा भारतच भासतो. म्हणजेच त्यादिवशी तुम्ही इथेही गणपती बाप्पा मोरया असा जयघोष ऐकू शकता.'' मोदींनी गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करताचा उपस्थित श्रोत्यांमधूनही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होऊ लागला.
PM Narendra Modi in Paris: I was told that Ganesh Mahotsav has become an important part of Paris's cultural calendar. On this day Paris looks like a mini India, which means in some days we will hear 'Ganpati Bappa Morya' chants here as well pic.twitter.com/cXwtUbwYa0
— ANI (@ANI) August 23, 2019
दरम्यान, आज भारतीय समुदायाला संबोधित मोदींनी आपल्या सरकारने केल्या कामगिरीचा लेखाजोखा मोदींनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आता या देशात टेम्पररी असे काही राहिलेले नाही. जे टेम्पररी होते ते आम्ही काढून टाकले आहे, आता स्थायी व्यवस्थेच्या दिशेने देश निघाला आहे, असे सांगत मोदींनी कलम 370 हटवण्याच्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरही हल्लाबोल केला. नवा स्वप्नांचा भारत आता नव्या प्रवासाला निघाला आहे, असेही मोदींनी सांगितले.
मोदी म्हणाले, भारतात आता टेम्पररी व्यवस्थेला स्थान नाही. तुम्ही पाहिले असेल की 125 कोटी लोकांचा देश, गांधी आणि बुद्धांची भूमी, राम-कृष्णाच्या भूमीवरून टेम्पररीला काढता काढता 70 वर्षे निघून गेली. टेम्पररी गोष्ट घालवण्यासाठी 70 वर्षे, मला तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले होते,'' असा टोला त्यांनी कलम 370 वरून लगावला.