PM नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:50 AM2023-07-14T10:50:28+5:302023-07-14T11:03:17+5:30
फ्रान्स देशाकडून सर्वोच्च नागरी सन्मान भुषवण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत.
पॅरिस - पंतप्रधान नरेंद्र मोदीफ्रान्सच्या २ दिवसीय दौऱ्यावर असून, पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी ते राफेल, पाणबुड्यांवर मोठी संरक्षण डील करणार आहेत. या दौऱ्यापुर्वी मोदींनी फ्रान्सचे वृत्तपत्र लेस इकोसला दिलेल्या मुलाखतीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यतेवर भाष्य केले आहे. त्यामुळे पुन्हा या विषयावरून दोन्ही बाजुने चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताला भारतीय नागरिकांनीही गर्दी केली होती. तर, फ्रान्सच्या राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदींचा 'लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवही करण्यात आला.
फ्रान्स देशाकडून सर्वोच्च नागरी सन्मान भुषवण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत. लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार जगभरातील काही प्रमुख नेत्यांना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनाच प्रदान करण्यात आला आहे. त्यात, दक्षिण आफ्रीकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीचे पूर्व चान्सलर अँजेला मर्केल, संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस बुट्रोस-घाली सब अन्य काहींचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींना आत्तापर्यंत अनेक देशांकडून गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये, आता फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचाही समावेश झाला आहे.
I thank President @EmmanuelMacron and Mrs. Macron for hosting me at the Élysée Palace this evening. pic.twitter.com/OMhydyleph
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2023
दरम्यान, यापू्र्वी नरेंद्र मोदींना जून २०२३ मध्ये मिस्रद्वारे ऑर्डर ऑफ द नाइल, मे २०२३ मध्ये पापुआ न्यू गिनी देशाकडून कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, मे २०२३ मध्ये कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, मे २०२३ मध्ये पलाऊ गणराज्य द्वारे एबाकल, तर, २०२१ मध्ये भूतानने ड्रुक ग्यालपो, २०२०२ मध्ये अमेरिका सरकारने लीजन ऑफ मेरिट, २०१९ मध्ये बहरीनद्वारे किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां, २०१९ मध्ये मालदीवच्या ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन, रूसकडून ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू पुरस्कार, २०१९ मध्ये यूएई द्वारा ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड, २०१८ मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन अवॉर्ड, २०१६ मध्ये अफगानिस्तानद्वारे स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान आणि २०१६ मध्ये सौदी अरबकडून ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद या पुरस्कारांनी पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले आहे.
भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे - मोदी
फ्रान्समधील वर्तमान पत्रास दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, युएनएससीमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटेन हे स्थायी सदस्य आहेत. भारताला या परिषदेत काही वेळा गैर स्थायी सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या संपूर्ण महाद्वीपांकडे दुर्लक्ष केले जात असताना ती जागतिक संघटनेचा प्राथमिक भाग आहे असे आपण कसे म्हणू शकतो? तसेच सर्वाधिक लोकसंख्येचा देश आणि सर्वात मोठी लोकशाही कायमस्वरूपी सदस्य नसताना ही संस्था जगासाठी बोलते असा दावा कसा करू शकतो? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला आहे.