राष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी ? महाराणी एलिझाबेथ सोडणार पद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 04:18 PM2018-04-16T16:18:11+5:302018-04-16T16:18:11+5:30
92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
लंडन- राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला आजपासून सुरुवात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रवाना झाले आहेत. या परिषदेकडे कॉमनवेल्थ सदस्य देशांबरोबर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ या पदावरुन आता निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. 92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नवे राष्ट्रकुलप्रमुख कोण असतील यावर विचार होणार आहे. एलिझाबेथ यांच्यानंतर राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारताचे पंतप्रधान 2009 नंतर पहिल्यांदाच या सभेला जात आहेत. यापुर्वी माल्टा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी यांच्या मतानुसार, भारताचा विविध धोरणात्मक संस्थांमध्ये वावर वाढला आहे आणि कॉमनवेल्थही त्यापैकीच एक आहे. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्त्वाची भूमिका हवीच आहे आणि इंग्लडलाही भारताने कॉमनवेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी असे वाटते. 16 आणि 17 एप्रिल हे दोन दिवस पंतप्रधान मोदी स्वीडन येथे असतील. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफ्वेन यांची ते भेट घेतील आणि व्यापार, संरक्षणविषयक करारांवर ते स्वाक्षरी करतील. त्यानंतर इंडिया-नॉर्डिक शिखर परिषदेतही सामिल होणार आहेत. नॉर्डिक परिषदेमध्ये डेन्मार्क, फिनलंड, आईसलँड आणि नॉर्वेही सहभागी होतील.
पंतप्रधानांचे होणार भव्य स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्लंडमध्ये उचित स्वागत झाल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातर्फे राष्ट्रकुल सदस्य राष्ट्रांच्या अध्यक्षासांठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. थेरेसा मे यांच्याशी विविध विषय़ांवर ते चर्चा करतील आणि मेक इन इंडियाअंतर्गत भारतात गुंतवणूक वाढण्यासाठी ते प्रयत्न करतील असे सांगितले जात आहे.