नरेंद्र मोदी म्हणजे वाजपेयी नव्हेत

By admin | Published: May 19, 2014 11:19 PM2014-05-19T23:19:41+5:302014-05-19T23:19:41+5:30

पाकिस्तानच्या तमाम प्रमुख वृत्तपत्रांनी आपली स्थानिक निवडणूक असावी इतके महत्व भारतीय सत्तांतराला दिले आहे.

Narendra Modi is not Vajpayee | नरेंद्र मोदी म्हणजे वाजपेयी नव्हेत

नरेंद्र मोदी म्हणजे वाजपेयी नव्हेत

Next

मेघना ढोके, नाशिक - पाकिस्तानच्या तमाम प्रमुख वृत्तपत्रांनी आपली स्थानिक निवडणूक असावी इतके महत्व भारतीय सत्तांतराला दिले आहे. पहिल्या पानावर मोठ्ठी छायाचित्रे, भारतातील विविध राज्यांत दिसणारे ट्रेंडस, जयललिता-मायावती-ममता-नितीश-लालू ते शरद पवार या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना जनतेने दिलेला कौल असे सारे तपशीलवार वृत्तांकन या वृत्तपत्रात आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून लाभलेल्या पुण्याईवर कॉँग्रेस पक्ष तरला, आता मात्र भारतीय राजकारणाची आणि मतदाराची वीणच बदलली आहे, घराणेशाही मोडीत निघाली आहे, असे या वृत्तांकनांचे म्हणणे दिसते. त्यातून त्यांना आपल्याही जनतेला सुचवायचे आहे की जे भारतात घडते तेच पाकिस्तानातही घडावे. बड्या सरंजामशाही वृत्तीच्या घराण्यांनी आणि नेत्यांनी वेळीच जागे होत जनतेला गृहित धरणे बंद करावे. तेथील अनेक राजकीय विश्लेषक हे मान्य करतात की ‘मोदी इज नो वाजपेयी’.मोदी वाजपेयींइतके मवाळ नाहीत त्यामुळे या मोदी सरकारचा पाकिस्तानवर थेट परिणाम होईल. एकीकडे तालीबान, दुसरीकडे मोदी आणि मधे पिचलेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था यात पाकिस्तानला फार सावध व्हावे लागेल असे मत द न्यू इंटरनॅशनल या लाहोर आणि इस्लामाबादहून प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्राच्या अग्रलेखात नोंदवलेले आहे. हा अग्रलेख म्हणतो, ‘मोदींच्या मते ‘आपण ( पाक) त्यांच्याशी जसे वागतो तसे ते आपल्याशी वागतील. नवाज शरीफांनी वेळीच मैत्रीचा हात पुढे करत पाक भेटीचे निमंत्रण दिले हे उत्तम.’ मोदी सत्तारुढ होणार या बातमीपाठोपाठ एक धास्तीही पाकिस्तानी राजकीय विचारवंत आणि अभ्यासकांत उघड निर्माण झालेली दिसते. पाकिस्तानमधले ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. हसन अक्सारी रिझवी द डॉन नावाच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘भारतीय जनतेच्या नव्याने जाग्या झालेल्या अस्मितेला अधिक सुखावण्यासाठी मोदी सत्तेत येताच पाकिस्तानला धारेवर धरत मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानला जाब विचारतील. दुसरीकडे मोदी पक्के व्यावसायिक आहेत, ते म्हणतील बाकी चर्चा नंतर आधी भारताला ‘विशेष देशाचा दर्जा’ द्या आणि आमचे उत्पादन तुमच्या बाजारपेठेत थेट उतरू द्या.’ पाकिस्तानी बाजारपेठ भारतीय वस्तूंना खुली करुन देण्याची मागणी आता भारतातून जोर धरेल असाही काहींचा कयास आहे. एकीकडे भारतीय निवडणूक प्रक्रियेचे प्रचंड कौतुक, रक्ताचा एकही थेंब न सांडता महाकाय देशात झालेल्या सत्तांतराचे अप्रूप आणि दुसरीकडे शेजारच्या तुलनेने ‘मवाळ’ लोकशाही देशात प्रचंड बहुमताने उदयास आलेल्या कट्टर ‘धार्मिक’ आणि काहीशा हेकेखोर नेतृत्वाची धास्ती या वर्तमानपत्रात वाचायला मिळते. मोदींनी प्रस्तावित केलेले विकासाचे मॉडेल अभ्यासत पाकिस्ताननेही हे ‘मोदीनॉमिक्स’ गांभिर्याने घ्यावे असे सुप्त आवाहन आणि दुसरीकडे अ‍ॅग्रेसिव्ह मोदींच्या नव्या भारताशी संबंधांची खबरदारी या कात्रीत पाकिस्तानी राजकीय-सामाजिक विश्लेषक सापडलेले दिसतात. निवडणूक निकालांनंतर ‘मोदीं’च्या भारताला कसे ‘हॅण्डल’ करायचे या प्रश्नाची भेदक काळजी पाकिस्तानच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत ठळकपणे अधोरेखित झालेली दिसते. धास्ती-कौतुक-अप्रूप आणि भारताच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या आशावादाचे निखळ कुतूहल पाकिस्तानी वृत्तपत्रातल्या पानांत पसरलेले दिसते. हिंदुत्ववादी ‘मोदी’ सरकारशी मैत्रीचा मूडही ठळकपणे दिसतो.

Web Title: Narendra Modi is not Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.