नरेंद्र मोदींनी वाजपेयींच्या मार्गाने जावं - खुर्शीद कसुरींची अपेक्षा
By admin | Published: October 12, 2015 07:08 PM2015-10-12T19:08:08+5:302015-10-12T19:15:28+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकस्तानचे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी व्यक्त केली आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी इतिहासाचं पार खोबरं केलेलं आहे असं सांगताना पुढचा प्रवास हा सहमतीने, चर्चेने करायला हवा असं कसुरी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये चांगल्या विचारांची बुद्धीमान माणसं आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांबाबत प्रत्येक गोष्टीवर देखरेख करावी असं सांगतानाच संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीपेक्षा ही माणसं जास्त चांगलं आणि सकारात्मक काम करतील असा प्रस्ताव कसुरी यांनी मांडला.
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसुरींना व कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगितलं तर शिवसेनेचा विरोध कायम राहील आणि वेट अँड वॉच करा असं सांगत शिवसेनेच्या संजय राउत यांनी कार्यक्रम उधळण्याची शक्यता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरू झाला व कुठलाही अनुचित प्रकार न घडता पारही पडला.
इतिहासासंबंधी असलेले गैरसमज सुधारणं हा पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे असं सांगणा-या कसुरींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- दोन्ही देशांतील तणावामुळे सामान्य नागरिक, जवान शहीद होत आहेत. इच्छा असेल तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेलच.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विकासाचे वचन दिले आहे, पण आपल्याला शांततेची आवश्यकता आहे. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांचा मार्गच योग्य होता, हे मोदींच्या लक्षात येईल अशी मला आशा आहे.
- दोन्ही देशांनी इतिहासाची हत्या केल्यानेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- या पुस्कातून मी वस्तुस्थिती मांडली आहे.
- भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेदरम्यान सरकारबाह्य शक्तींना असता कामा नये.
- दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आहेत, ते दूर करणे, हाच हे पुस्तक लिहीण्यामागचा उद्देश होता.
- फाळणीच्या निर्णयामुळे तेथील हिंदू खूप संतापले होते, त्यामुळे पंडित जवाहरलाला नेहरूंनी लाहोरला भेट दिल्याची आठवण कसुरींनी सांगितली.
- आपसांत संवाद साधला तरच नवीन इतिहास निर्माण होऊ शकतो, दोन्ही देशांच्या सरकारनी संवाद कायम राखला पाहिजे.
- माझ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.