नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 04:49 PM2017-07-07T16:49:01+5:302017-07-07T17:14:43+5:30
आज जी-20 शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चासुद्धा केली आहे
ऑनलाइन लोकमत
हॅमबर्ग, दि. 7 - भारत आणि चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या सिक्कीम सीमेच्या वादावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सुरुवातीला भेट होणार नाही, अशी चर्चा होती. मात्र आज जी-20 शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चासुद्धा केली आहे. त्यामुळे मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मोदी आणि शी जिनपिंग यांनी भेट घेतल्याची अधिकृत माहिती दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, भेटीदरम्यानची माहिती अद्यापही उघड केलेली नाही.
दरम्यान, चीनने जर्मनीतील हॅमबर्ग येथे पार पडणा-या जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. मात्र अचानक या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्या वातावरण पोषक नसल्याचं चीननं स्पष्ट करत भेट घेणार नसल्याचं सांगितलं होतं.
भारत आणि चीनमधील वाद संपवण्यामध्ये ही बैठक महत्त्वाची ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही देशाच्या प्रमुखांमध्ये हॅमबर्ग येथे बैठक होईल, असं सांगण्यातही येतंय. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग जी-20 परिषदेत बातचीत करत सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सुरू असलेला वाद संपवतील, अशी सूत्रांची माहिती होती. मात्र अद्यापही सिक्कीम सीमेसंदर्भात काही चर्चा झालीय, याचा तपशील अद्यापही उघड झालेला नाही. जर्मनीत होत असलेल्या जी 20 शिखर परिषदेमध्ये चीनला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोबतच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांना परिषदेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनीदेखील भारताचं कौतुक करताना दहशतवादाविरोधात घेतलेली कठोर भूमिका आणि आर्थिक विकासात होत असलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केलं.
आणखी वाचा
मुजोर चीनची पुन्हा भारताला धमकी
तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी
सिक्किमप्रश्नी कूटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
हॅमबर्ग येथे शुक्रवारपासून जी 20 परिषदेला सुरुवात झालीय. त्याधीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिका-याने सांगितलं आहे की, "राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि नरेंद्र मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी सध्या योग्य वातावरण नाही". भारत वादग्रस्त सीमेवरून आपले सैनिक मागे हटवत परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा या अधिका-याने व्यक्त केली होती. शुक्रवारी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांची बैठक होईल असंही या अधिका-याने यावेळी स्पष्ट केलं होतं. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग सामील होतील. यावेळी त्यांची बैठक होईल का विचारलं असता, वेळ आल्यावर माहिती देण्यात येईल असं सांगितलं.