नरेंद्र मोदी यांची विविध नेत्यांशी चर्चा
By admin | Published: September 6, 2016 04:02 AM2016-09-06T04:02:02+5:302016-09-06T04:02:02+5:30
आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीचे अध्यक्ष रिसिप तय्यिप एर्दोगॅन यांच्याशी चर्चा केली
हँगझोऊ (चीन) : आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीचे अध्यक्ष रिसिप तय्यिप एर्दोगॅन यांच्याशी चर्चा केली तसेच स्कॉर्पिन या भारतीय पाणबुडींशी संबंधित गोपनीय माहिती फुटल्याचा विषय फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉईस होलँड यांच्याकडे उपस्थित केला. जी-२० देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा येथे झाली. त्याआधी मोदी यांनी ब्रिटनच्या नूतन पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतरच्या परिस्थितीत उभय देशांना किती संधी मिळू शकतात याची चाचपणी करण्यासाठी चर्चा केली.
एर्दोगॅन यांच्याशी ४८ सदस्यांच्या आण्विक पुरवठादार गटाच्या सदस्यत्वासाठी मोदी यांनी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. भारताच्या सदस्यत्वाला चीन व तुर्कस्तानने एनएसजीच्या सोलमध्ये विरोध केलेला होता. भारताने अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केलेली नाही, असे चीनने सांगून आक्षेप घेतला होता. गेल्या जुलैमध्ये तुर्कस्तानमध्ये एर्दोगॅन यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अयशस्वी बंड झाले होते. त्यामागे मुस्लीम धर्मगुरू फेतुल्लाह गुलेन यांची योजना होती. या गुलेन यांचे पाठिराखे भारतात राहात असल्याचा मुद्दा तुर्कीने विरोध करताना घेतला होता. (वृत्तसंस्था)