पंतप्रधान जाणार जनकपूरमधील जानकी मंदिरात; 11 मे पासून नेपाळ दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 01:39 PM2018-05-07T13:39:48+5:302018-05-07T13:39:48+5:30
नवी दिल्ली- नेपाळचे पंतप्रधान केपी ओली भारतात येऊन गेल्यानंतर महिन्याभरातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे रोजी नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. दोन्ही देशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे.
काठमांडूला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी दक्षिण नेपाळमधील जनकपूर येथे जानकी मंदिराला भेट देतील तसेच वायव्य नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील मुक्तीनाथ मंदिरालाही ते भेट देतील. मुस्तांग आणि काठमांडूला जाण्यापूर्वी जनकपूर येथील प्रांतिक सरकार नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार करणार आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान 900 मेगावॅट क्षमतेच्या वीजप्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासाठी मुस्तांग, जनकपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये संरक्षण व्यवस्था कडक करण्यात आली आहे, अशी माहिती मुस्तांग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख शिशिर पौडेल यांनी वृत्तसंस्थेला दिली. गेल्या महिन्यामध्ये नेपाळच्या बिरातनगर येथील भारतीय वाणिज्यदुतावासासमोर प्रेशर कुकर बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरक्षाव्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.
नेपाळदौऱ्यानंतर पंतप्रधान शांतीनिकेतन येथे बांगलादेश भवनच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. तेथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही ते भेट घेतील. हे भवन बांगलादेश सरकारच्या मदतीने बांधण्यात आले आहे. या वर्षी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. भारतही बांगलादेशबरोबर विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहे.
भारताच्या दहशातवादविरोधी भूमिकेस बांगलादेशाने चांगली साथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि शेख हसिना वाजेद यांची गेल्या महिन्यामध्ये लंडनमध्ये भेट झाली होती. राष्ट्रकूल परिषदेच्यावेळेस हे दोन्ही नेते लंडन येथे गेले होते. शेख हसिना आणि ओली यांच्या भेटीमुळे जून महिन्यात बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्नीकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या म्हणजेच बिमस्टेकच्या बैठकीस मदत होणार आहे. ही बैठक नेपाळमध्य़े होणार आहे. बिमस्टेकच्या सात सदस्यांमधील सौहार्द वाढविण्यासाठी भारत प्रयत्न करत आहेत. इस्लामाबाद येथील सार्क परिषदेस भारत उपस्थित राहाणार नसल्याचे भारताने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या भेटीवर जाणार आहेत.