मोदींच्या मित्राने दुसऱ्यांदा भारत दौरा रद्द केला; कारण एकच 'निवडणूक'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 07:39 PM2019-09-03T19:39:33+5:302019-09-03T19:40:41+5:30
नेतन्याहू यांनी भारत दौरा रद्द करण्याबाबत पंतप्रधान मोदींसोबत आज सकाळी चर्चा केल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.
जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एकदिवसीय भारत दौरा अचानक रद्द केला आहे. येत्या 9 सप्टेंबरला ते भारतात येणार होते.
नेतन्याहू यांनी भारत दौरा रद्द करण्याबाबत पंतप्रधान मोदींसोबत आज सकाळी चर्चा केल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. याला पंतप्रधान मोदी यांनी संमती दिल्यानंतर दौरा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
इस्त्रायलमध्ये 17 सप्टेंबरला संसदीय निवडणूक होणार आहे. ही निवडणूक नेतन्याहू यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण एप्रिलमध्येही तेथे निवडणूक झाली होती. मात्र, बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापन करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन संसद भंग करण्याचा प्रस्ताव संमत केला. यामुळे इस्त्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होणार आहे.
इस्त्रायलच्या इतिहासात कोणालाच एकहाती सत्ता नाही
इस्त्रायलच्या इतिहासात आजपर्यंत कधीही एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, जास्त जागा जिंकलेला पक्ष इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करत होता. यामुळे इस्त्रायलमध्ये ही पहिलीच वेळ आहे की पंतप्रधान आघाडी करण्यात अपयशी ठरले आहेत. नेतन्याहू यांनी दक्षिणपंथी पक्षांसोबत गेल्या सहा आठवड्यात अनेकदा वाटाघाटी, चर्चा केल्या. मात्र, त्यात यश न आल्याने शेवटी संसद भंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. उपस्थित 120 पैकी 119 खासदारांनी मतदानात भाग घेतला होता. यामध्ये 74 खासदारांनी संसद भंग करण्याच्या बाजुने आणि 45 जणांनी विरोधात मतदान केले.
नेतन्याहूंना मिळालेल्या 35 जागा
नेतन्याहू यांच्या पक्षाला केवळ 35 जागा मिळाल्या होत्या. तर दुसरा पक्ष ब्लू एंड व्हाइटला 34 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्ष आघाडी करून सत्ता स्थापन करतील अशी आशा होती. मात्र, बोलणी फिस्कटल्याने देशात बहुमताचे सरकार बनले नाही.