चंद्रावर असं केलंत तर याद राखा...; NASA च्या प्रमुखांनी चीनला दिला इशारा! 'ड्रॅगन'चे इरादेही जगाला सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 09:51 PM2023-01-02T21:51:19+5:302023-01-02T21:53:13+5:30
दक्षिण चीन समुद्र असो किंवा मग इतर कोणताही प्रदेश चीनची विस्तारवादी भूमिका सर्वांना ठावूक आहे.
दक्षिण चीन समुद्र असो किंवा मग इतर कोणताही प्रदेश चीनची विस्तारवादी भूमिका सर्वांना ठावूक आहे. यातच आता चंद्रावरही चीन आपली जमीन असल्याचा दावा करेल याची 'नासा'ला भीती आहे. 'नासा'चे प्रमुख बिल नेल्सन यांनी जे सांगितलंय ते नक्कीच धक्कादायक आहे. नासाच्या प्रमुखांच्या दाव्यानुसार जर अमेरिकेच्या आधी चीननं चंद्रावर आपले पाय घट्ट करण्यास सुरुवात केली तर चीन तिथंही आपलीच जमीन असल्याचा दावा करण्यास सुरुवात करेल. तसंच इतर देशांच्या अंतराळवीरांनाही अंतराळात जाण्यात अडचणी निर्माण करू शकतो.
माजी वैज्ञानिक आणि सध्याचे नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी रविवारी एका मुलाखतीत चीनला उघड इशारा दिला आहे. "जर चीनने अमेरिकेच्या आधी चंद्रावर जम बसवला, तर चीन तिथल्या संसाधनांनी समृद्ध प्रदेशांवर कब्जा करेल", असं नेल्सन म्हणाले.
"चीनशी अंतराळात आमची स्पर्धा आहे हे खरं आहे. पण आपल्याला यासोबत याचीही काळजी घ्यावी लागेल की वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली चीननं चंद्रावर कब्जा करण्यास सुरुवात करता कामा नये. जर असं झालं तर चीन भविष्यात नक्कीच तिथल्या जमिनीवर आपला दावा सांगू शकतो आणि इतर देशांना मज्जाव करण्यास सुरुवात करू शकतो", असंही नेल्सन म्हणाले.
२०२२ मध्ये चीननं आपल्या अंतराळ अभियानात नव्या स्पेस स्टेशनच्या निर्मितीची यशस्वीरित्या सुरुवात केली आहे. तसंच नासा आता आर्टेमिस मिशन सीरिजवरही काम करत आहे. २६ दिवसांच्या नासाच्या आर्टेमिस मिशनची सुरुवात १ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या मिशन अंतर्गत नासाला चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो टिपायचे आहेत.
नासाचं मिशन आर्टेमिस १ पृथ्वीवर २६ दिवसांचा कालावधी पूर्ण करुन डिसेंबर महिन्यात परतला. दुसरीकडे मंगळ ग्रहावरही नासा पूर्णपणे लक्ष केंद्रीत करुन आहे. मंगळावरील माती, वातावरणासह इतर माहिती जाणून घेण्यासाठी नासाकडून रोबोटिक रोव्हर देखील पाठवण्यात आले आहेत.
चीन, अमेरिका, रशियामध्ये अंतराळात स्पर्धा
सध्याच्या स्थितीत चीनचं जिनपिंग सरकार अंतराळ अभियानावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे. अंतराळातील ताकद वाढविण्यासाठी चीन सातत्यानं प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अमेरिका देखील मागे नाही आणि सातत्यानं नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. युक्रेनशी युद्ध सुरू असलेल्या रशियानंही अंतराळात आपलं सामर्थ्य वाढवण्याच्या प्रयत्नात कोणतीही कमतरता येणार नाही याची काळजी घेतली आहे. तिन्ही देश सध्या हायपरसोनिक शस्त्रांच्याबाबतीत स्वत:ला मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.