चंद्रावर पाठवणार व्हॅक्यूम क्लीनर, सेकंदात नमुने गोळा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:35 IST2025-01-17T07:34:38+5:302025-01-17T07:35:11+5:30
चंद्रावरील संसाधनांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांसाठी एलपीव्ही उपयुक्त ठरणार आहे.

चंद्रावर पाठवणार व्हॅक्यूम क्लीनर, सेकंदात नमुने गोळा होणार
न्यूयॉर्क : चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासा चंद्रावर एक अनोखा व्हॅक्यूम क्लीनर पाठवत आहे. त्याला लूनर प्लॅनेटव्हॅक (एलपीव्ही) असे नाव देण्यात आले आहे. हे एलपीव्ही मिशन १५ जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे. चंद्रावरील संसाधनांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांसाठी एलपीव्ही उपयुक्त ठरणार आहे.
ब्लू ओरिजिनची कंपनी हनीबी रोबोटिक्सने विकसित केलेला एलपीव्ही हा हाय-टेक व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे काम करेल. चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करण्यासाठीच त्याची खास निर्मिती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
सेकंदात नमुने गोळा होणार
एलपीव्ही काही सेकंदात नमुने गोळा करू शकते. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील वायूचा वापर करून माती आणि धूळ गोळा करून ती एका कंटेनरमध्ये जमा करेल असे, नासाने सांगितले.
१४ दिवसांची मोहीम
चंद्रावर १४ दिवस ही एलपीव्ही मोहीम चालेल. जर ती मोहीम यशस्वी झाली तर भविष्यातील मोहिमांमध्ये हेच तंत्रज्ञान वापरण्यात येईल.
एलपीव्ही चंद्रावरील सूर्यास्ताची दृश्ये देखील कॅप्चर करेल. हे अभियान नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश चंद्रावरून नमुने घेऊन येणे हा आहे.
यांत्रिक हात नाहीत
एलपीव्हीमध्ये कोणतेही यांत्रिक हात नाहीत. हे व्हॅक्यूम क्लिनरसारखे काम करते. चंद्रावरील पाणी, हेलियम आणि इतर महत्त्वाच्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी नासा या उपकरणाचा वापर करेल, असे नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमधील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
बेजोसकडून मस्क यांना आव्हान
अंतराळ क्षेत्रातील ‘ब्लू ओरिजिन’ने गुरुवारी ‘न्यू ग्लेन’ उपग्रहाची यशस्वी चाचणी करून उद्योजक इलॉन मस्क यांना आव्हान दिले आहे. या चाचणीच्या माध्यमातून एक प्रोटोटाइप उपग्रह हजारो मैल अंतरावर पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करण्यात आला. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या अमेरिकन नागरिकाच्या नावावरून या रॉकेटला ‘न्यू ग्लेन’ हे नाव देण्यात आले.