‘नासा’ची पुढील वर्षी सूर्यावर स्वारी!

By admin | Published: June 2, 2017 04:03 AM2017-06-02T04:03:11+5:302017-06-02T04:03:11+5:30

सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ हे अंतराळ यान पुढील वर्षी ३१ जुलै रोजी रवाना करण्याची

'NASA' launches sunrise next year! | ‘नासा’ची पुढील वर्षी सूर्यावर स्वारी!

‘नासा’ची पुढील वर्षी सूर्यावर स्वारी!

Next

वॉशिंग्टन : सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ हे अंतराळ यान पुढील वर्षी ३१ जुलै रोजी रवाना करण्याची घोषणा ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी केली.
ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती २०२५मध्ये संपेल. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल एवढे जवळ जाईल. २,५५० फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी ४.३० लाख किमी वेगाने सूर्याच्या २४ प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या ताऱ्याच्या वातावरणाचा अभ्यास करेल. सुमारे १० फूट उंचीचे हे यान वितळून जाऊ नये यासाठी बाह्यभागावर एका विशिष्ट कार्बनी संयुगाचा पाच इंच जाडीचा मुलामा केलेला असेल.
मानवाने सहा दशकांपूर्वी अंतराळ संशोधनास सुरुवात केली तेव्हापासून सूर्याला गवसणी घालून त्याची रहस्ये उलगडणे हे त्याचे अंतिम उद्दिष्ट राहिले आहे. ‘नासा’ने याआधी पाठविलेल्या काही यानांनी याहूनही दूरवरचा प्रवास केलेला आहे. सन २०१५ मध्ये प्ल्युटो ग्रहाच्या जवळून गेलेले ‘दि न्यू होरायझन प्रोब’ या यानाने आत्तापर्यंत ३.५ अब्ज मैलांचा प्रवास केला असून ते अद्याप थांबलेले नाही. त्याआधी १९७७ मध्ये ‘व्हॉयेजर-१’ हे यान ११.७ अब्ज मैलांचा प्रवास करून आपल्या सूर्यमालेच्या पार बाहेर निघून गेले.
असे असले तरी ‘पार्कर सोलर प्रोब’ या यानाची कामगिरी या सर्वांहून मोलाची ठरणार आहे. सूर्य हा संपूर्ण ग्रहमालेचा केंद्रबिंदू आणि ऊर्जेचा स्रोत असल्याने त्याची रचना, तेथील वातावरण, तेथे होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया या सर्वांच्या अभ्यासातून मिळणारी माहिती ग्रहमालेच्या उत्पत्तीच्या आणि भविष्याच्याही वेध घेण्यासाठी बहुमोल ठरणार आहे. थेठ सूर्यावर यान उतरविणे शक्य नसल्याने त्याच्या शक्य तेवढया जवळ जाऊन हे काम करणारे ‘पार्कर सोलर प्रोब’ हे पहिले यान असणार आहे. (वृत्तसंस्था)


ऐतिहासिक मोहीम

आधी ‘संोलर प्रोब प्लस’ या नावाने योजलेल्या या यानाचे ‘नासा’ने आता ‘पार्कर सोलर प्रोब’ असे नामकरण केले आहे. संपूर्ण ग्रहमालेस व्यापून टाकणाऱ्या सौरवाऱ्यांचा वैज्ञानिक सिद्धान्त ६० वर्षांपूर्वी मांडून त्याचा पाठपुरावा करणारे थोर खगोलभौतिकी शास्त्रज्ञ प्रा. युजिन पार्कर यांच्या सन्मानार्थ हे नामकरण करण्यात आले आहे.
‘नासा’ने त्यांच्या कोणत्याही अंतराळ यानास कोणाही जिवंत व्यक्तीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘नासा’ने ही घोषणा केली तेव्हा ९० वर्षांचे प्रा. पार्कर एखाद्या तरुणासही लाजवेल अशा उत्साहाने हजर होते. या यानासोबत प्रा. पार्कर यांचे एक छायाचित्र, त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाची समग्र जंत्री व त्यांच्या पसंतीने त्यांनी सूर्याला उद्देशून लिहिलेला एक संदेश एका चीपमधून पाठविला जाईल.

Web Title: 'NASA' launches sunrise next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.