'ध्यानस्थ मोदी' जगाने पाहिले, पण अंतराळातील हे योगी कोण?; NASAच्या फोटोची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:57 PM2019-05-20T14:57:49+5:302019-05-20T15:48:07+5:30
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला केदारनाथ दौरा आणि गुहेत लावलेले ध्यान हा देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. आता योग-ध्यानाचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला केदारनाथ दौरा आणि गुहेत लावलेले ध्यान हा देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. आता योग-ध्यानाचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र या फोटोचा मोदींशी काहीही संबंध नाही. नासाने हा फोटो शेअर केला असून, हा फोटो अंतराळामधील एका ग्रहगोलाचा आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार हा ग्रहगोल पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रहगोल आहे ज्याचे छायाचित्र टिपणे शक्य झाले आहे. विशेष बाब म्हणजे या गोलाची आकृती एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या माणसाराखी आहे. हा ग्रहगोल प्लूटोपासून अब्जावधी मैल दूर अंतरावर आहे. या ग्रहाला अल्टिमा थुले असे नाव देण्यात आले असून, त्याचे छायाचित्र नासाच्या न्यू होरायजन्स या यानातून टिपण्यात आले आहे.
अल्टिमा थुले हा ग्रहगोल पृथ्वीपासून 6.4 किमी दूर अंतरावर आहे. या ग्रहगोलाला दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. त्यातील मोठा भाग जो सपाट आहे त्याला अल्टिमा नाव देण्यात आले आहे. तर त्याला जोडून असलेल्या गोल भागाला थुले असे संबोधण्यात आले आहे. तर या ग्रहगोलाचे दोन्ही भाग जिथे जोडले जातात त्याला नेक असे नाव देण्यात आले आहे. 17 मे रोजी सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात याला 2014 एमयू 69 असे नाव देण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हा ग्रहगोल ध्यानस्थ बसलेल्या माणसासारखा दिसतो. ग्रहांच्या निर्मितीवेळीच याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते.
नासाचे न्यू होरायझन यान सध्या पृथ्वी पासून 6.6 अब्ज किमी अंतरावर आहे. हे यान आता कइपर बेल्टमध्ये वेगाने प्रवेश करत आहे. तसेच याचा वेग सुमारे 53 हजार किमी प्रति तास एवढी आहे. न्यू होरायझन यानामधूनच अल्टिमा थुलेचे छायाचित्र घेण्यात आले आहे. या ग्रहगोलाचा पृष्ठभाग लाल असून, त्यावर ज्वालामुखीही असावा, अशी शक्यता आहे. या ग्रहगोलावर शास्त्रज्ञांना मिथेनॉल आणि पाण्याच्या बर्फाचे काही अंशसुद्धा मिळाले आहेत. मात्र येथील बर्फ थोडा वेगळा आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अल्टिमा थुलेचा पृष्ठभाग आगीसारखा लाल आहे. त्यामुले इथे जागृत ज्वालामुखी असावा, असा अंदाज आहे. नासाने प्रसिद्ध केलेली छायाचित्रे ही जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काढण्यात आली होती.