ऐतिहासिक क्षण! कृष्णविवराचा पहिला फोटो नासाकडून प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 09:03 PM2019-04-10T21:03:09+5:302019-04-10T21:05:33+5:30
जगभरात सहा टेलिस्कोपनं कृष्णविवर चित्रीत
न्यू यॉर्क: नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच कृष्णविवराचा (ब्लॅकहोल) फोटो प्रसिद्ध केला. वैज्ञानिक जगताच्या दृष्टीनं ही मोठी कामगिरी मानली जात आहे. या कृष्णविवरातून गॅस आणि प्लाझ्माच्या नारंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसत आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 4 हजार कोटी किलोमीटर दूर आहे. युरोपियन टेलिस्कोपनं (इवेंट हॉरिझन टेलिस्कोप) कृष्णविवर चित्रीत केला आहे. यासाठी जगभरात सहा टेलिस्कोप लावण्यात आले होते.
कृष्णविवराच्या प्रकल्पावर मोठ्या संख्येनं वैमानिक काम करत होते. यासाठी हवाई, ऍरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुवावर इवेंट हॉरिझन टेलिस्कोप लावण्यात आले होते. या टेलिस्कोप्सची निर्मिती कृष्णविवराचा फोटो टिपण्यासाठी करण्यात आली होती. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता नासानं कृष्णविवराचे फोटो जारी केले.
कृष्ण विवर म्हणजे काय?
कृष्णविवर ही काही तार्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचं गुरुत्वाकर्षण इतके जास्त असतं की, प्रकाशदेखील त्यांपासून सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्यांना कृष्णविवर म्हणतात.
कृष्णविवर अतिशय शक्तिशाली
कृष्णविवरातील गुरुत्वाकर्षण अतिशय शक्तिशाली असतं. यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणंदेखील जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्याला कृष्णविवर म्हटलं जातं. कृष्णविवर त्याच्यावर पडणारे सर्व प्रकारचे प्रकाश शोषून घेतो. त्यामुळे त्यातून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही.